वीज कंपनीचा भोंगळ कारभार : पाच हजार ग्राहकांना अ‍ॅव्हरेज बिल


शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील यांची उर्जा मंत्र्यांकडे तक्रार

भुसावळ : शहरातील  श्रीनगर, गणेश कॉलनी, वेडी माता मंदिर परिसर, भुसावळ हायस्कूल, भिरुड कॉलनी, खळवाडी, काशीराम नगर, अष्ट विनायक कॉलनी, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, भोई नगर, मोहित नगर, जुना सातारा या परीसरातील सुमारे पाच हजार ग्राहकांना अ‍ॅव्हरेज रीडींग पाठवण्यात आले तर पाचशेपेक्षा जास्त वीज ग्राहकांना दुसर्‍याच ग्राहकांच्या मीटरची देयके पाठवण्यात आली तसेच देयक भरणा सूट असलेल्या तारखेच्या एक दिवस आधी वीज ग्राहकांच्या हाती बिल देण्यात आल्याने वीज कंपनीच्या सावळा-गोंधळ कारभाराची शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे. वीज कंपनीचे अधिकारी वीज मीटर बसवणार्‍या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारी करण्यात आला आहे.

महावितरणच्या कारभाराविरोधात तक्रारींचा पाऊसच
श्रीनगर येथील भरत लोखंडे यांना तब्बल सलग आठ महिने एव्हरेज बिल देण्यात आल्यानंतर त्यांनी नियमितपणे देयक अदा केले व दर महिन्याला अर्ज सादर केला आणि अचानक या महिन्यात त्यांना 12 हजार 320 रुपयांचे देयक आले. साधारण परीवारातील ग्राहकाला अशी देयके पडवणारी नाही. रवींद्र ओंकार सोनवणे यांना आठ महिन्यांच्या बिलात सुधारणा झालीच नाही. लिलाधर आनंद पाटील यांना दर महिन्याला 132 युनिटचे वाढीव बिल दिले जात आहे. भुसावळ हायस्कूल परीसरातील नीरज महेशदत्त तिवारी यांना अवाजवी बिल देऊन महिन्यातून दोन वेळेस महावितरणच्या कार्यालयाचा फेर्‍या कराव्या लागल्या. भोई नगर येथील सुरेश भोई यांना दुसर्‍याच ग्राहकाचे बिल दिले जात आहे. अयोध्या नगरातील साहेबराव माळी यांना तर बिले दिली गेली नाही. खैरनार वाडीतील सर्वच ग्राहकांना वाढीव बिले आहेत. अश्या असंख्य तक्रारी शिवसेनेचे तालुका संघाटक प्रा.धिरज पाटील यांच्याकडे आल्या आहेत.

मीटरचा संगणकीकरणाचा फायदा नाहीच
गेल्या आठ महिन्यांपासून भुसावळमधील हजारो ग्राहकांना अव्वाच्या सवा रकमेची वीज बिले येत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आर.एफ.मीटरचा संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नाही. अजूनही मीटर रीडींग एजन्सीच रीडींग वाचन करीत असून चुकीचे रीडींग देत आहे.

महावितरणचा प्रामाणिकांना शॅाक : प्रा.धीरज पाटील
शहरात महावितरण कंपनीकडून नियमित वीज बिल भरणार्‍या प्रामाणिक ग्राहकाकडून वीज बिल भरण्यास एखाद्या वेळेस उशीर झाल्यास लगेच त्रास दिला जात आहे मात्र अनेक बड्या ग्राहक, काही बडे हॉटेल व्यावसायीक, संस्था, केंद्र यांची अनेक महिन्यांची हजारो रुपयांची थकबाकी असतानाही अशा लोकांना साधी विचारणाही करण्याचे धाडस हे अधिकारी किंवा कर्मचारी करत नाहीत. जुने वीज मीटर काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत मात्र असंख्य ठिकाणी दबावापोटी अजूनही जुनेच वीज मीटर ठेवण्यात आले आहेत. नवीन आर एफ इलेक्ट्रॉनिक मीटर हे बोगस कंपन्यांचे असल्याचे समोर आले आहे. तपासणीसाठी पाठवण्यात येणारे फास्ट मीटरही नेहमीच योग्य असल्याचा अहवाल वीज मंडळाकडून दिला जात असतो. वीज वितरण कंपनीचे अधिकारी, वीज मीटर बसवणार्‍या ठेकेदारांना दंड ठोकावा व काळ्या यादीत टाकावे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा प्रा.धीरज पाटील यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !