हतनूर धरणातून पाणीपुरवठा होणार्‍या 110 गावांना यंदा जूनमध्ये टंचाईची भीती

गाळामुळे बॅकवॉटर वाढल्याने बाष्पीभवनातही वाढ

0

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा अधिक तापमानामुळे गतवर्षाच्या तुलनेत नऊ टक्के कमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी 53.60 टक्यांवर असलेला जलसाठा यंदा 44.86 टक्यांपर्यंत घसरला आहे. हतनूर धरणातून पाणीपुरवठा होणार्‍या 110 गावे व प्रकल्पांना पाणीटंचाईची भिती निर्माण झाली आहे. जूनच्या अखेरपर्यंत पाऊस न झाल्यास टंचाई निर्माण होणे निश्चित मानले जात आहे.

धरणातील गाळाची समस्या गंभीर
हतनूर धरणात पूर्णा नदीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचत आहे. जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, धरणगाव आदींसह तब्बल 110 गावे व रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसीसारख्या प्रकल्पांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी शुक्रवार, 3 मे रोजी धरणात 269.60 दलघमी जलसाठा अर्थात 53.60 टक्के जलसाठा होता तर शुक्रवारी तो 245.40 दलघमी अर्थात 46.86 टक्के इतका आहे. उन्हाळ्यात गतवर्षापेक्षा साठा कमी, त्यातही तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जलसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. हतनूर धरणाचे तापी व पूर्णा नदीत तब्बल 40 किलोमीटरपर्यंत बॅकवॉटर आहे. गाळाचे प्रमाण वाढल्याने बॅकवॉटरची लांबीही वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यात धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. गाळ व बाष्पीभवन या दोन्ही कारणांमुळे धरणातील सुरक्षीत जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे आगामी काळात हतनूरमधील पाणीसाठा क्षमता पुन्हा कमी होणार आहे.

आठ विस्तारीत दरवाजे रखडले
धरणातून पावसाळी हंगामात पूर व्यवस्थापनासोबत गाळाचे सहज उत्सर्जन व्हावे, बुडीत क्षेत्रात येणार्‍या गावांमध्ये पाणी शिरू नये यासाठी 12 बाय 8 मिटरचे आठ विस्तारीत दरवाजांचे काम प्रस्तावित होते. सध्या स्थितीतील दरवाजे 207.500 मीटर सी लेव्हल आहे. आठ दरवाजांची या लेव्हल यापेक्षा एक मीटरने या दरवाजांची लेव्हल खाली होती. यामुळ गाळाचे उत्सर्जन होणार होते मात्र हे कामही अनेक वर्षांपासून रखडले आहे. यामुळे साठवण क्षमता कमी होत आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साठा टिकेल
हतनूर धरणात गाळाचे प्रमाण वाढत असले तरी आजही हतनूर अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवत आहे. योग्य नियोजन करुन धरण 100 टक्के भरल्यास भुसावळ विभागातील 110 गावे, प्रमुख शहर व औद्योगिक प्रकल्पांची तहान भागवली जाते. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. पण जूलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साठा टिकेल, असे हतनूरचे शाखा अभियंता एस.जी.चौधरी म्हणाले.


कॉपी करू नका.