शिरूडमध्ये 14 लाखांची रोकड असलेले एटीएमच चोरट्यांनी लांबवले


एटीएम लांबवण्यासाठी धुळ्यातून चोरले वाहन : नूतन पोलिस अधीक्षकांना चोरट्यांची सलामी

धुळे : तालुक्यातील शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएमच चोरट्यांनी लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या एटीएममध्ये तब्बल 14 लाखांची रोकड असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यापूर्वीदेखील 10 ऑक्टोबर रोजी गावातील एटीएम लांबवण्याचा प्रयत्न झाला मात्र गावकर्‍यांना जाग आल्याने चोरट्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. विशेष म्हणजे शुक्रवारी या एटीएममध्ये शनिवार व रविवार दोन दिवस लागून सुट्या असल्याने पैसे टाकण्यात आले होते व त्याची माहिती कदाचित चोरट्यांना असल्यानेच त्यांनी पाळत ठेवून एटीएम लांबवल्याची शक्यता आहे. एटीएम चोरी होण्यापूर्वीच पोलिसांचे गस्ती वाहन पथक दहा मिनिटे आधी या भागातून गेले मात्र त्यानंतर चोरट्यांनी काम फत्ते करीत पळ काढला. चोरट्यांच्या शोधार्थ सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांना चोरट्यांची सलामी
शिरूड गावातून चोरट्यांनी एटीएम लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, डीवायएसपी श्रीकांत घुमले, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, धुळे तालुका निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक सुकदेव भोरकडे, उपनिरीक्षक गजानन गोटे, यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञासह श्‍वानाला पाचारण करण्यात आले मात्र श्‍वान गावाजवळ असलेल्या वेशीजवळ घुटमळला. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांना रूजू होवून 48 तास होत नाही तोच चोरट्यांना त्यांना सलामी दिल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

अवघ्या तीन मिनिटात काम केले फत्ते
रात्री दोन वाजून 19 मिनिटांच्या सुमारास चेहर्‍यावर शाल झाकलेल्या एका चोरट्याने एटीएमच्या दालनात प्रवेश करीत वायररोप एटीएमला अडकवला व पीकअपच्या सहाय्याने एटीएम बाहेर काढल्यानंतर अन्य तीन चोरटे पीकअपमध्ये एटीएम टाकताना दिसत आहेत विशेष म्हणजे माहितगार चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण कुठेही दिसणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतले असून त्यांनी डोक्यावर कॅप परीधान केल्या आहेत. एटीएमएम पीकअपमध्ये टाकल्यानंतर दोन वाजून 21 मिनिटांनी चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने चोरटे हे अट्टल असल्याचा अंदाज आहे शिवाय त्यांना या परीसराची माहितीदेखील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएम लांबवल्याच्या घटनेनंतर पहाटे 2.40 वाजता नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेत वरीष्ठांना माहिती दिली. रात्रभर हॉटेल्स, धाबे तसेच परीसराचा बारकाईने शोध घेण्यात आला तसेच नाकाबंदीही करण्यात आली.

चोरीसाठी धुळ्यातून वाहनाची चोरी : गुन्हा दाखल
ईपीएस कंपनीचे चॅनल मॅनेजर प्रवीण सुधाकर पाठक (वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी 14 लाख सात हजार 500 रुपयांच्या रोख रकमेसह 50 हजार रुपये किमतीचे एटीएम मशीन लांबवल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी गावातील सेंट्रल बँकेचे एटीएम मशीन पळवत असताना ग्रामस्थांना जाग आल्यानंतर चोरट्यांना वाहनासह पळ काढावा लागला होता तर त्यावेळी गुन्ह्यातील वाहन वरखेडी शिवारात सापडले होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री एटीएम लांबवण्यासाठी चोरट्यांनी धुळे शहरातील अग्रवाल नगर भागातून पीकअप वाहन लांबवले तसेच पीकअप वाहन चोरीस गेल्याचा गुन्हादेखील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शनिवारी सकाळी दाखल झाल्यचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अधिक तपास निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !