भुसावळात पोलिसांतर्फे हद्दपारी, एमपीडीए प्रस्ताव तयार करण्यावर भर
भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरूध्द एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्यात आले मात्र निवडणुकीच्या गर्दीत हे प्रस्ताव तसेच पडून असल्याने आता त्या प्रस्तावांना चालना दिली जात आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेल्या प्रस्तावांवर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. अजूनही हद्दपारी व एमपीडीएच प्रस्ताव तयार केले जात असल्याचे सांगण्यात आले.
एमपीडीए प्रस्तावावर लवकरच निर्णय
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन असे पाच प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले असून अजूनही काही जणांचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लवकरच एमपीडीए प्रस्तावावर निर्णय अपेक्षित आहे तर हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून तयार केले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रस्ताव तयार केले जात आहे, निवडणुकीच्या गर्दीत अन्य कामांमध्ये ते राहून जाऊ नये यासाठी नियोजन केले आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, निरीक्षक गजानन पडघन यांनी प्रस्ताव तयार केले आहे. हे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले जात आहेत.
