चिनावल गावातील संचारबंदी हटवली : बंदोबस्त मात्र कायम

गावात शांतता राखा ः अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते


सावदा : चिनावल गावात कायमस्वरुपी शांतता राखण्यासाठी आपण सर्वस्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक समिती बनवून गावातील वाद गावातच मिटवावेत व यापुढे जर गावात असे प्रकार वारंवार घडल्यास यावेळी लागलेल्या संचारबंदी बंदीपेक्षा ही कठोर कारवाई करण्याचा इशारा सोमवार, 20 रोजी चिनावल येथे झालेल्या सर्वस्तरीय बैठकीत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिला. चिनावल येथील नूतन विद्यालयात ही बैठक झाली. दरम्यान, चिनावल गावातील संचारबंदी हटवण्यात आली असून बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

दोषींवर कठोर कारवाई होणार
अपर पोलीस अधीक्षक नखाते, रावेर तहसीलदार बंडू कापसे, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा सहा.निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, जबाबदार ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावात शांतता राखण्यासाठी काय उपाय-योजना करता येतील या विषयी चर्चा झाली. गावकरी यांनी आपल्या भावना मांडल्या. नखाते यांनी या घटनेतील आरोपी शोधून कायदेशीर कारवाई होणार असल्याचा विश्वास दिला तसेच यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याची तंबी दिली. अफवा पसरवणार्‍या व भावना भडकावणार्‍या लोकांची नावे, पोलिसांना द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

संचारबंदी उठवल्याने  दिलासा
शु्रकवार, 17 मे च्या रात्री चिनावल येथे झालेल्या दगडफेकीनंतर येथे तीन दिवसीय संचारबंदी लावण्यात आली होती मात्र यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकरी, शेतमजूर यांना शेतातील कामे करता यावी यासाठी सकाळी सात ते आठ व दुपारी परत येण्यासाठी 12 ते एक अशा दोन तासाची प्रशासनाने शिथीलता दिल्याने ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला.

गावात काटेकोर बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक खांडबहाले, गर्जे हे तळ ठोकून आहेत. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने संपूर्ण चिनावल गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. महसूल विभागाचे तहसीलदार बंडू कापसे, अपर तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळाधिकारी अनंत खवले, तलाठी लीना राणे हे लक्ष ठेवून आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !