भुसावळातील बेपत्ता तरुणाचा तापीत आढळला मृतदेह
भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या व शनिवारपासून बेपत्ता असलेल्या रवी प्रकाशलाल मूलचंदानी (30) या तरुणाचा रविवारी दुपारी यावल हद्दीतील नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाचा आत्महत्येने मृत्यू की घातपाताने मृत्यू? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे. याबाबत यावल पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. रवी मूलचंदानी यांचे शहरात मोबाईल दुकान असून ते नेहमीप्रमाणे शनिवारी दुकानावर जाण्यासाठी निघाले मात्र घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला होता. रविवारी दुपारी यावल पोलिस ठाणे हद्दीतील अंजाळेनजीक या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर तरुणाची दुचाकीदेखील आढळली आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परीवार आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास एएसआय नेताजी पंडित वंजारी करीत आहेत.
