शिरूडमधील 14 लाखांची एटीएम चोरी : तिखी शिवारात पीकअप आढळली
चोरटे शिरजोर : दुसर्या वाहनातून एटीएम अन्यत्र हलवल्याची शक्यता
धुळे : तालुक्यातील शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे 14 लाखांची रोकड असलेले एटीएम चोरट्यांनी लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली खळबळ उडाली असतानाच रविवारी दुपारी तिखी शिवारात एटीएम चोरीसाठी वापरण्यात आलेले पीकअप वाहन सापडले आहेत मात्र त्यात एटीएम नसल्याने चोरट्यांनी अन्य वाहनाने ते इतरत्र हलवल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, चोरट्यांच्या शोधार्थ धुळे पोलिसांचे पाच स्वतंत्र पथक सर्वत्र रवाना करण्यात आले आहे.
नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी दिली होती सलामी
जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना रूजू होवून 48 तासांचा कालावधीत होत नाही तोच चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेले एटीएम लांबवल्याने पोलिस विभागाला कडक सलामी दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे रात्री 2.19 मिनिटांनी चोरट्यांनी एटीएम दालनात प्रवेश करीत 2.21 मिनिटांनी काम फत्ते केल्याने चोरटे सराईत असल्याचे स्पष्ट झाले होते तर चेहर्याची ओळख न पटण्यासाठी तसेच वाहन क्रमांकावरून शोध न लागण्यासाठी चोरट्यांनी धुळ्यातून पीकअप वाहन चोरल्याने पोलिस दलापुढे चोरट्यांच्या तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
चोरीचे वाहन सापडले मात्र चोरटे सापडेना
रविवारी दुपारी तिखी शिवारात डोंगराळ भागात चोरट्यांनी एटीएम चोरीसाठी वापरलेले वाहन बेवारस स्थितीत आढळल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पाहणी केली मात्र त्यात एटीएम आढळले नाही. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिासांनी या वाहनावरून चोरट्यांचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र चोरटे अन्य वाहनाने मशीन घेवून लंपास झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा पोलिस दलापुढे निर्माण झाले आहे. अधिक तपास तालुक्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.

