साक्रीत अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म
साक्री आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका निलंबित
साक्री : शहरातील सावित्रीबाई फुले आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या वसतिगृहाच्या अधीक्षिका अश्विनी वानखेडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, बाळाला जन्म देणार्या विद्यार्थिनीसह बाळाला अधिक उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वसतिगृह प्रशासनाची बेपर्वाई उघड
अल्पवयीन विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंकाळी सात वाजता बाळाला जन्म दिल्यानंतर या बाळाला एका बादलीत टाकून गुड शेफर्ड शाळेच्या भिंतीजवळ सोडून वसतिगृह गाठले होते तर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर वस्तिगृहातील मुलींना घटनास्थळी धाव घेतली होती तसेच पोलिसांना घटना कळवल्यानंतर त्यांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर या बाळाला वसतिगृहातील एका विद्यर्थिनीने जन्म दिल्याची बाब उघड झाली होती. दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थिनी गरोदर असल्याची बाब वैद्यकीय तपासणीत उघड कशी झाली नाही हा प्रश्न असून वसतिगृह प्रशासनाची बेपर्वाई यात उघड झाली आहे.

