भुसावळ विभागातील चार कर्मचार्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान
भुसावळ : कर्तव्यावर असतांना अत्यंत चोखपणे महत्वपूर्ण काम करीत रेल्वेचे मोठे संभाव्य अपघात टाळल्याने भुसावळ विभागातील चार रेल्वे कर्मचार्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाव्यवस्थापक आर.के.यादव यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
चार कर्मचार्यांना मिळाले पुरस्कार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भुसावळ विभागातील चार कर्मचार्याचा संरक्षा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कर्तव्यादरम्यान दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत कर्मचार्यांनी दिलेले योगदान, अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, संरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि दोन हजार रुपये रोख असे स्वरूप होते.


सतर्क कर्मचार्यांच्या कार्याची दखल
बडनेरा येथे 6 मे या दिवशी यार्डात ड्युटीवर असतांना मालगाडी डब्याचा अॅक्सेल हॉट झाल्यानंतर तत्काळ संबंधितांना माहिती दिल्याने मोठाच अनर्थ टळल्याने खुशाल दत्तूजी यांना सन्मानीत करण्यात आले. 15 मे या दिवशी बडनेरा रेल्वे स्थानकातून जात असलेल्या मालगाडीच्या बेअरींग कपला तडा गेलेला दिसला व त्यातून ग्रीस गळत असल्याने हा डबा गाडीपासून दूर केल्याने मोठी दुर्घटना टळल्याने टेक्निशियन भावना अमोल गजभिये यांना सन्मानीत करण्यात आले. बोरगाव रेल्वे स्थानकावर ट्रॅक मेन्टेनर संदीप शामराव वानखेडे यांनाहीही 25 एप्रिलला गाडीच्या डब्याचे अॅक्सल हॉट झालेले दिल्याने त्यांनी बोरगाव स्टेशन मास्तरांना माहिती दिल्याने डबा वेगळा केल्याने मोठीच दुर्घटना टळली. माना रेल्वे स्थानकावर 16 मे या दिवशी कीमन इंजिनीअर सिध्दार्थ भिका तायडे यांनी रेल्वे रूळाला तडा गेल्याचे निदर्शनास येताच तात्काळ संबंधितांना माहिती दिली, त्यामुळे मोठीच दुर्घटना टळळी. यांनाही गौरविण्यात आले.
सतर्क व प्रामाणिकपणे कामाची अपेक्षा
महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. अशा सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे महाव्यवस्थापक यादव यांनी मनोगतात सांगितले. यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम.एस.उप्पल, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक एस.एस.गुप्ता, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सुनील कुमार आदी उपस्थित होते.