चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडला साडेपाच लाखांचा गुटखा
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सोमवार, 10 जून रोजी दुपारी 3 वाजता चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात कारवाई करीत पाच लाख 56 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी रात्री 10 वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात प्रवीण सुरेश पाटील याच्याकडे प्रतिबंधात्मक गुटखा असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोमवार, 10 जून रोजी दुपारी 3 वाजता कारवाई केली. यावेळी वाहन क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.6743) या वाहनातून वाहतूक करून घरात साठवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीसांनी गुटखा व सुगंधित तंबाखूसह वाहन असा एकूण पाच लाख 56 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्टेबल राहुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण सुरेश सोनवणे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहे.
