सैन्य दल अधिकार्याच्या नावाने जळगावच्या महिला डॉक्टरांना सव्वा लाखांचा गंडा
जळगाव :जळगाव शहरातील डॉ. सुजाता प्रमोद महाजन (62, रा. गांधीनगर, जिल्हापेठ) यांना एक लाख 24 हजार 992 रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार 21 मे रोजी घडला. याप्रकरणी सोमवार, 10 जून रोजी दुपारी तीन वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
डॉ.सुजाता महाजन यांना 20 मे रोजी अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना सैन्य दलातील अधिकारी बोलत असून तुमच्याकडे जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्याने व्हिजिटिंग कार्ड मागविले. डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरुन कार्ड पाठवले. दुसर्या दिवशी 21 मे रोजी दुपारी 12 वाजता महिला डॉक्टरच्या पतीशी समोरील व्यक्ती बोलून त्याने 40 ते 50 जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले.

अज्ञाताविरोधात गुन्हा
डॉ.प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला. त्यावेळी ठगाने डॉ. सुजाता महाजन यांच्याकडून फोन पे ची संपूर्ण माहिती घेतली. बोलणे सुरू असतानाच डॉ.सुजाता महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होवू लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून एक लाख 24 हजार 992 रुपये ट्रान्सफर झाले. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवार, 10 जून रोजी दुपारी तीन वाजता जिल्हापेठ पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नरेश सोनवणे करीत आहे.
