भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभा सत्ताधार्यांनी चर्चेविनाच गुंडाळली
दोन विषयांवर वाद झाल्याने विषय केले तहकूब : विरोधक संतप्त
भुसावळ : तब्बल चार महिन्यांनी भुसावळ पालिकेत बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांकडून करांच्या वसुलीसह मन्साई बायोवेस्टचे मागील दहा वर्षांचे बिल काढण्यावरून सत्ताधारी व विरोधकांत वादंग झाल्यानंतर हे दोन्ही विषय तहकूब केल्यानंतर अन्य विषयाां कुठलीही चर्चा न करता सत्ताधार्यांनी मंजुरी देत सभागृह सोडले. सत्ताधारी सभागृहातून बाहेर गेल्यानंतरही तब्बल अर्धा तास विरोधी गटाचे नगरसेवकांनी सभागृहात ठाण सत्ताधार्यांच्या कृतीविषयी तीव्र संताप व्यक्त केला.
कर्मचार्यांच्या प्रश्नाला मंजुरी
सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रमण भोळे होते. व्यासपीठावर गटनेते मुन्ना तेली, उपनगराध्यक्षा सईदा शे.शफी, मुख्याधिकारी करुणा डहाळे आदींची उपस्थिती होती. सभेत पहिल्याच विषयाचे वाचन झाल्यानंतर विषय क्रमांक दोननुसार गेल्या स्थायी सभांच्या कार्यवृत्ताला मंजुरीबाबत विरोधी गटाचे नगरसेवक उल्हास पगारे व दुर्गेश ठाकूर यांनी आक्षेप घेतला. कार्यवृत्त वाचन करावे किंवा त्याची माहिती सभागृहाला द्यावी यानंतर कार्यवृत्ताला मंजुरी द्यावी, या मागणीवर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी कार्यवृत्ताची माहिती नगरसेवकांना दिली जाईल, असे आश्वासन दिले तर विषय क्रमांक चार ते सात हे कर्मचार्यांच्या संदर्भातील असल्याने त्याला विरोधक व सत्ताधार्यांनी मंजुरी दिली.
कराच्या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधकांचा आक्षेप
विषय क्रमांक आठ हा रेल्वे हद्दीतील अतिक्रमण झालेल्या घरांची वसूली दिलेल्या बजेटमधून कमी करणेबाबत विचार विनिमय करणे हा असल्यानेया विषयावर विरोधी गटाचे उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, साधना भालेराव आदींसह सत्ताधारी गटाच्या लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे आदींनी आक्षेप घेतला. करधारक जर कराची रक्कम भरणा करण्यास तयार आहेत तर त्यांना बजेटमधून का कमी केले जात आहे? पालिकेचे उत्पन्न कमी करण्याचा अधिकार नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांना कोणी दिला? अशा प्रश्नांची सरबत्ती नगरसेवकांनी केल्यानंतर नगराध्यक्ष भोळे यांनी हा विषय कार्यालयाकडून सभागृहात आल्याचे स्पष्टीकरण दिले. अतिक्रमणानंतर पुर्नवसन झालेल्या घरमालकांचा शोध घेता येत नाही मात्र बजेटमध्ये ही रक्कम वाढीव दिसते, असे सांगून नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच कर विभागाच्या अधिकार्यांनीही माहिती देवूनही नगरसेवक ऐकण्यास तयार नसल्याने मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी माईक हातात घेवून हा विषय तहकूब केला जात असल्याचे जाहीर केले. नवव्या विषयाला मंजुरी दिल्यानंतर दहाव्या विषयावरही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. हा विषयदेखील तहकूब केल्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी विषय क्रमांक 11 ते 52 ला आवाजी मंजूरी देवून सभागृहातून काढता पाय घेतला. यानंतरही जनआधारचे नगरसेवक तब्बल अर्धा तास ठाण मांडून होते.
नगरसेवक ठाकूर यांनी पेहरावातून वेधले लक्ष
शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नी सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी गटाचे गटनेते दुर्गेश ठाकूर यांनी बॅनरचा सचित्र पेहराव केला. स्वच्छता, घरकुल आदी प्रश्नी मागण्या त्यांनी या पेहरावातून सभागृहासमोर मांडल्या. या प्रश्नी सभेपूर्वीच त्यांनी प्रशासनाला निवेदनही दिले.
विषय मांडण्याआधीच संपली बैठक : पिंटू कोठारी
नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले की, पालिकेच्या सभेत कोरोना व्हायरसबद्दल चर्चा करावयाची होती मात्र त्याआधीच बैठक आटोपती घेण्यात आली. राज्यातदेखील कोरोनाचे रुग्ण आढळल्याने स्थानिक स्तरावरही त्याबाबत खबरदारी व उपाययोजना आवश्यक होत्या मात्र विषय मांडण्याआधीच बैठक उरकण्यात आली. शहरात उघड्यावर सर्रास मांसाची विक्री होत असून शिल्लक मांसाची योग्यरीतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पालिका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मांस विक्रीसाठी पालिकेने बंदीस्त मार्केटची निर्मिती करावी, अशी अपेक्षाही नगरसेवक कोठारी यांनी व्यक्त केली आहे.

