भुसावळात हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अन्न-पाण्यासह मिळाली वैद्यकीय सुविधा
भुसावळ : झारखंड राज्यातील चक्रधरपूर रेल्वे मंडळातील बाराबम्बो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेलचा अपघात 18 डबे रेल्वे रूळावरून उतरल्याने दोन प्रवासी ठार तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. अपघातग्रस्त रेल्वे गाडीतील प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानकापर्यंत जाण्यासाठी पर्यायी दुसर्या डब्यांची व्यवस्था करून हावडा-मुंबई मेल स्पेशल ट्रेन चालवण्यात आली. ही गाडी भुसावळ स्थानकावर बुधवारी सकाळी 11.40 वाजता आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी जेवण, पाणी आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली.
1300 प्रवाशांना मोठा दिलासा
भुसावळ स्थानकावर हावडा-मुंबई मेल विशेष ट्रेनमध्ये एकूण एक हजार तीनशे अन्नाची पाकिटे आणि एकूण एक हजार 300 पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त एकूण एक हजार 100 पुरी भाजीची पाकिटे देण्यात आली. या व्यवस्थेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. याशिवाय गाडीतील सर्व प्रवाशांना रेल्वे आरोग्य विभागाच्या पथकाकडून वैद्यकीय मदत करण्यात आली आणि त्या सर्वांना औषधेही देण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या या व्यवस्थेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

प्रवाशांसोबत पाठवले पथक
भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचार्यांचे पथक, आरपीएफ विभागाचे पथक आणि वैद्यकीय विभागाचे पथक भुसावळहून प्रवाशांना गंतव्य स्थानकापर्यंत अन्य काही मदतीसाठी पाठवण्यात आले. भुसावल स्थानकावर विशेष ट्रेनच्या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, विभागीय वैद्यकीय अधिकारी, स्थानक व्यवस्थापक, तिकीट तपासणी कर्मचारी, वाणिज्य आणि खानपान विभागाचे निरीक्षक, आरपीएफ, आणि स्टेशन कर्मचारी स्टेशनवर उपस्थित होते.
