मुक्ताईनगरात संत मुक्ताई पालखीचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत


मुक्ताईनगर (11 ऑगस्ट 2024) : आषाढीनिमित्त पंढरपूर गेलेल्या संत मुक्ताईंचा पालखी सोहळा शनिवार, 10 ऑगस्ट रोजी कोथळी येथील मूळस्थानी विसावला. यानिमित्त पालखी सोहळा उत्सव समितीने आयोजित भव्य वारकरी संप्रदायिक दिंडी स्पर्धेने लक्ष वेधले. साडेपाच तास ही परतवारी सुरू होती. या वेळी झालेल्या दिंडी स्पर्धेत महिला, पुरुष व बालगट मिळून एकूण 110 भजनी मंडळांनी भक्तीचा मळा फुलवला.

दिंडीने स्पर्धेने वेधले लक्ष
मुक्ताईनगर ते पंढरपूर व पुन्हा प्रदीर्घ प्रवासानंतर शुक्रवारी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा मुक्ताईनगरीत दाखल झाला होता. शनिवारी नवीन मुक्ताई मंदिर ते कोथळी येथील जुने मंदिर (समाधीस्थळ) या तीन किमी अंतरात वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा झाली. श्रावणसरी कोसळत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास नवीन मंदिरापासून स्पर्धेला सुरुवात झाली. मुख्य रस्त्याने बस स्थानक, प्रवर्तन चौक, संत गजानन महाराज मंदिर, आस्था नगरी मार्गे कोथळीतील जुने मुक्ताई मंदिर असा मार्ग होता. तीन किमी अंतर चालण्यासाठी साडेपाच तास लागले. दुपारी साडेचारला पालखी मूळ स्थानी दाखल झाली. तेथे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, उद्धव जुनारे हजर होते. पालखीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !