माझी शाळा सुंदर शाळा अभियानात एणगाव हायस्कूल प्रथम
बोदवड (11 ऑगस्ट 2024) : शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत एणगांव (ता.बोदवड ) येथील गोपाळ देवबा ढाके विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तब्बल तीन लाखांच्या बक्षिसाचा धनादेश आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते समारंभ पूर्वक देण्यात आला. 1 जानेवारी 2024 पासून 45 दिवसांसाठी ही स्पर्धा राबविण्यात आली होती. शैक्षणिक गुणवता, आरोग्य तपासणी, आर्थिक साक्षरता, क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमांतील विद्यार्थी सहभाग, शाळा परिसराचे सौदर्यीकरण, प्लास्टिकमुक्त शाळा आदी निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.
तज्ज्ञांनी केले मूल्यमापन
शैक्षणिक वर्ष -2023/24 मध्ये मुख्यमंत्री-माझी शाळा-सुंदर शाळा या उपक्रमातून शाळेत अनेकविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शहरी व ग्रामीण असा फरक न करता ग्रामीण भागातील शाळांसाठी तालुका स्तरावर
प्रथम क्रमांक- तीन, द्वितीय दोन तर तृतीय एक लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले. पंचायत समिती, शिक्षण विभागाने तज्ज्ञांच्या माध्यमातून मूल्यमापन सुध्दा केले.त्यातून जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा यांच्यातून क्रमवारी काढण्यात आली. माध्यमिक स्तरावर जी. डी. ढाके विद्यालय ,एणगाव ही शाळा सर्वं निकषांत तालुकास्तरावर अव्वल ठरली व तीन लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथे मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते तीन लाखांचा धनादेश, प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला.

