निमगाव येथे सततधार पावसात घर कोसळले : वृद्धा बचावली
यावल (11 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील निमगाव येथे सततधार पावसामुळे मातीच्या भिंती व पत्राचे छत असलेले घर शनिवारी अचानक कोसळले. या घरात 80 वर्षीय वृद्ध महिला राहत होती. घर कोसळताच ग्रामस्थांनी धाव घेतली व वृद्ध महिलेला ढिगार्यातून बाहेर काढले. महिलेला किरकोळ दुखापत झाली असून घर कोसळल्यामुळे अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य असे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही वृद्ध महिला उघड्यावर आली आहे.
निमगाव, ता.यावल या गावात सुमनबाई रमेश पाटील (80) ही वृद्धा राहते. ा महिलेचे मातीचे आणि वरतून पत्री छत असलेले घर आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात सततधार पाऊस सुरू आहे. या पावसात त्यांच्या भिंतीमध्ये पाणी मुरून शनिवारी सकाळी अचानक भिंती कोसळल्या आणि पत्री छतदेखील कोसळले. यामध्ये ढिगार्यात 80 वर्षीय वृद्ध महिला दाबली गेली. तातडीने ग्रामस्थांनी धाव घेत सुमनबाई यांना बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र घर कोसळल्यामुळे घरातील अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य असे एकूण दीड लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने पत्री छताच्या लाकडी दांड्याच्या आडोशात वृध्द महिला एकाकडील भिंतीजवळ लाकडाआड राहिल्याने बाल-बाल बचावली. घराचा पंचनामा करून महिलेस नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

