यावल शहरातील वाणी गल्लीतील 66 वर्ष जुनी इमारतीची भिंत कोसळली : दाम्पत्य बचावले
यावल (12 ऑगस्ट 2024) : शहरातील मेन रोडवरील वाणी गल्लीतील 66 वर्ष जुनी इमारतीची भिंत सततच्या पावसामुळे अचानक कोसळली. दुमजली इमारतीच्या भिंतीत पाणी मुरल्यामुळे भिंत कोसळली मात्र सुदैवाने वृद्ध दाम्पत्य बालंबाल बचावले. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली. नागरीकांच्या मदतीने वृद्ध दांपत्यास सुरक्षीत घरातून काढण्यात आले.
जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
शहरातील वाणी गल्लीत सन 1958 साली निर्माण करण्यात आलेली शरद माधव जिन्सीवाले यांची इमारत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या इमारतीच्या भिंतीत पाणी मरून शनिवारी सायंकाळी अचानक भिंत कोसळली. यावेळी शरद जिन्सीवाले व त्यांची पत्नी शोभना जिन्सीवाले हे दोघे वृद्ध घरात होते. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. निलेश गडे, राजेश श्रावगी यांनी त्या ठिकाणी धाव घेत वृद्ध दाम्पत्याला मदतीने बाहेर काढले. दुर्घटनेची माहिती मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उजैन्नसिंग राजपुत यांनी घटनास्थळी पाहणी केली व जिन्सीकर कुटुंबास धीर दिला. महसूल विभागाला या दुघर्टनेचा पंचनामा करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

