जळगावात चोरट्यांची हॅट्रीक : तिसर्या दिवशीही घरफोड्या

जळगाव- जळगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेलाच चोरट्यांनी आव्हान देत सलग तिसर्या दिवशी शिवाजी नगर परीसरातील इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर तसेच प्रजापत नगरातील घरफोडी केल्याने खळबळ उडाली आहे.
इंद्रप्रस्थ नगरातून 50 हजाराचा एैवज लांबविला
शिवाजीनगर परीसरातील इंद्रप्रस्थ नगरात मनोज पुंडलिक तिळवणे हे कुटुंबासह गावाला गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत अडीच तोळे सोने व 40 हजार रुपये रोख असा ऐवज लांबविला. नवीन घर घेण्यासाठी पैसे जमविले होते, त्यातच कंपनीत चार ते पाच महिने पगार होत नसल्याने या घटनेमुळे आर्थिक संकट ओढवले असल्याचे मनोज तिळवणे म्हणाले. सोमवारी सकाळी ते 9.30 वाजेच्या सुमारास गावाहून परतल्यानंतर घरफोडी उघडकीस आली.तिळवणे यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अंगणात शौच केली. यानतर पोबारा केला. दरम्यान कुंपनात एक प्लॅस्टिकची बॅटरी सापडली असून ती चोरट्यांची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्रजापत नगरातही काम फत्ते
ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापतनगरातील सुनंदिनी पार्कमधील धर्मेश भोजराज पांडव हे ऑटो आयकॉनमध्ये व्यवस्थापक आहेत. पांडव हे पत्नी कोमल, मुलगा हर्षल व मुलगी हेमा यांच्यासह राहतात. 16 रोजी रात्री त्यांच्या आई प्रभावती यांचे निधन झाल्याने शनिवारी सकाळी पांडव परीवारासह त्या ठिकाणी गेल्याची चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट फोडून एक हजार रुपये रोख लंपास केले.सोमवारी सकाळी गॅस एजन्सीच्या कर्मचारी घरी आल्यानंतर त्यास घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याने शेजारच्यांना माहिती दिली.




