नाल्यात तोल जावून पडल्याने भुसावळातील हॉटेल हेवनच्या मॅनेजरांचा मृत्यू
तीन दिवसानंतर आढळला मृतदेह : कठडे नसलेल्या गटारी असुरक्षित
The manager of Hotel Haven in Bhusawal died after falling into the drain भुसावळ (15 ऑगस्ट 2024) : शहरातील जामनेररोडवरील नाल्यात हॉटेल हेवनमध्ये मॅनेजर अजय अनिल रंगारे (42, गडकरीनगर) यांचा मृतदेह मंगळवार, 13 रोजी मध्यरात्री आढळून आला. शनिवारपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. नातेवाईकांकडून शोध सुरू असताना शनिवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ते शनी मंदिराजवळील नाल्याच्या शेजारी ढाप्याजवळ बुट घालताना तोल जावून नाल्यात पडल्याचे फुटेज शनी मंदिराच्या कॅमेर्यातून दिसले. यानंतर नातेवाईकांना शोध घेतल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे 300 ते 350 मीटर अंतरावरील हॉटेल मल्हारच्या समोरील ढाप्याखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरातील उघडे नाले, पुलांवरील तुटलेले कठडे आदी प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
निम्मे पुलांवर शहरात कठडेच नाहीत
शहरातील अंतर्गत सात नाल्यांवर तब्बल 12 ठिकाणी प्रमुख वाहतूकीचे पूल पालिकेने उभारले आहेत. यापैकी निम्मे पुलांवर कठडे नाहीत. दरम्यान मृत अजय यांच्या मृतदेहाचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन दुपारी रेल्वे हॉस्पीटल समोरील ख्रिश्चन ग्रेव्ह यार्डात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अजय यांच्या पश्चात वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
सीसीटिव्हीमुळे लागला शोध
मृत अजय हे शनिवारी सकाळी हॉटेल हेवनमधून निघाले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. यानंतर नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर जामनेररोडवरील शनी मंदिराजवळ असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यातून ते बुट घालताना तोल जावून ते नाल्यात पडत असल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी जोरदार पाऊस असल्याने रस्त्यावर वर्दळ होती. यामुळे ते नाल्यात पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. यानंतर मंगळवारी मध्यरात्री त्यांचा मृतदेह 300 मिटर अंतरावरील मल्हार हॉटेलच्या ढाप्याखाली आढळला.
निम्मे पुल कठड्यांविना, उर्वरितांचे स्टॅक्चरल ऑडीट नाही
काझी प्लॉट ते शनिमंदिर, खाल्लमा दर्गा, मरिमाता मंदिर, विठ्ठल मंदिर ते न्यू एरिया वॉर्ड, रजा चौक ते पापा नगर, खडका ते नेमाडे कॉलनी भागाला जोडणारा छोट्या पूलावर कठडे नाहीत. तर रजा टॉवर ते अमरदीप चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड ते चूडी मार्केट, जामनेररोड – एचडीएफसी बँक ते पांडूरंग टॉकीज, मामाजी टॉकीज रोड ते महात्मा फुले नगर, जळगावरोड ते वेडीमाता मंदिर भागाला जोडणी,सतारे भाग जळगावरोडवरील मरिमाता मंदिराजवळील पुल जर्जर झाले आहेत.
पाच महिन्यांतील दुसरी घटना
शहरात 10 मार्च रोजी खडकारोडवरील नाल्याच्या शेजारी खेळत असलेला अरसलान उर्फ बाबू बिहारी या तीन वर्षीय बालकाचाही मृत्यू झाला होता. हा प्रकारही माजी नगरसेवक आशिक खान यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर निदर्शनास आला होता. नाल्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची ही या पाच महिन्यांतील दुसरी घटना आहे. यामुळे शहरातील उघड्या नाल्यांचा प्रश्न अतीशय गंभीर झाला आहे.