पाचोरा तालुक्यात कापूस खरेदीत शेतकर्यांना तीन कोटींचा गंडा : व्यापारी पसार ; एकाला बेड्या
पाचोरा (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : पाचोरा तालुक्यातील पहान, तारखेडा, लोहतार तसेच परिसरातील विविध गावांमधील शेतकर्यांकडून कापूस खरेदी करीत शेतकर्यांची सुमारे तीन कोटींची रक्कम न देताच व्यापारी पसार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यापारी, त्याचा मुलगा व जावयाविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत जावयाला पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे.
असे आहे प्रकरण
ज्ञानेश्वर भिका पाटील (आशिर्वाद ड्रीम सिटी, पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत व व्यापारी हरिदास मोहनलाल ठक्कर (58, रा. आशीर्वाद ड्रीम सिटी, पाचोरा), व्यापार्याचा मुलगा हर्ष हरिदास ठक्कर व व्यापार्याचा जावई यश योगेश ठक्कर (गणेश कॉलनी, जळगाव) यांना 1 मे 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान जलाराम ट्रेडर्स येथे 39 लाख 28 हजार 450 रुपये किंमतीचा 491 क्विंटल कापूस आठ हजारांच्या दराने विक्री करण्यात आला. त्याचप्रमाणे या भागातील अनेक शेतकर्यांनी व्यापार्यासह जावई व मुलावर विश्वास ठेवून कापसाची विक्री केली मात्र शेतकर्यांना कापूस खरेदीनंतरही रक्कम देण्यात आली नाही. शेतकर्यांनी तगादा लावल्यानंतरही आरोपीने आज-उद्या रक्कम देण्याचे आश्वासन देत वेळ मारून नेली.
शेतकर्यांचा संताप अनावर
विशेष म्हणजे संशयीत आरोपी हरिभाई ठक्कर यांना त्यांच्या व्यवसायात मुलगा तसेच त्यांचा जावई यश ठक्कर मदत करीत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. व्यापार्याने शेतकर्यांकडील कापूस विकून त्या रकमेवर सोने घेतल्याचा दावा शेतकर्यांनी केला व व्यापार्याच्या जावयाला जाब विचारण्यासाठी पाचोरा तालुक्यातील पहान येथील हनुमान मंदिरात शेतकरी जमल्यानंतर पाचोरा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पहान येथील हनुमान मंदिर परिसरात शेतकरी, यश ठक्कर व त्याचे नातेवाईक उपस्थित होते.
तिघांविरोधात गुन्हा : एक संशयीत ताब्यात
यावेळी शेतकर्यांनी यश ठक्कर याच्यावर, त्याला त्याच्या सासर्याचा पत्ता माहिती असूनही तो सांगत नसल्यामुळे आपले पैसे अडकले असल्याचा आरोप केला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी शेतकर्यांची समजूत काढत त्यांना पाचोरा पोलिसात आणले व या प्रकरणी व्यापारी, त्याचा मुलगा व जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी सांगितले. यश ठक्कर यास पाचोरा पोलिसांनी अटक केली तर व्यापार्यासह त्याच्या मुलाचा पथकाद्वारे शोध सुरू करण्यात आला आहे.


