दिड लाखांचे नकली नोटा प्रकरण : पुरवठादाराचा बाजारपेठ पोलिसांकडून कसून शोध

अटकेतील त्रिकूटाला पाच दिवसांची पोलीस कोठडी : रावेरच्या नकली नोटा खरेदीदाराविरोधात यापूर्वी पाच गुन्हे दाखल


भुसावळ (6 सप्टेंबर 2024) : एक लाख खर्‍या नोटांच्या मोबदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा घेताना जळगावच्या दोघांसह रावेरच्या एकाला बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी शिताफीने अटक करीत त्यांच्याकडून तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. बुधवार, 4 सप्टेंबर रोजी नाहाटा महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली होती. अटकेतील तिघांना भुसावळ न्यायालयात गुरुवारी हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची (10 सप्टेंबर) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेतील रावेरच्या संशयीताविरोधात यापूर्वीही जिल्ह्यासह मलकापूर येथे बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत तर जळगावच्या दोघांना बनावट नोटा देणार्‍या पुरवठादाराचा आता कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

अटकेतील दोघा आरोपींविरोधात सहा गुन्हे दाखल
नकली नोटा प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेल्या सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (उस्मानिया पार्क, जळगाव) याच्याविरोधात वरणगाव पोलिसात ईसी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे तर अब्दुल हकीम अब्दुल कागल (57, रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) विरोधात बनावट नोटा चलनात बाळगल्याप्रकरणी तब्बल पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात एमआयडीसी, जळगाव, जिल्हापेठ, मलकापूर येथे प्रत्येकी एक तर जळगाव शहरला दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी अब्दुल हकीम हा बुधवारी भुसावळात जळगावच्या दोघा संशयीतांकडून बनावट नोटा खदेदीसाठी आला मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे तिघांच्या मुसक्या बांधल्या.

अटकेतील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
बाजारपेठ पोलिसांनी संशयीत सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (38, रा.उस्तानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीन खान (35, रा.सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कागल (57, रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) यांना अटक केली आहे. संशयीतांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलीस अधीक्षकांकडून पथकाचा गौरव
बनावट नोटा पकडणार्‍या बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जळगावात रिवॉर्ड देवून गौरव केला तसेच भविष्यातही चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई अमर अढाळे, शिपाई दिलीप कोल्हे, शिपाई राहुल वानखेडे, शिपाई भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

नकली नोटा पुरवठादाराचा शोध
नकली नोटा प्रकरणात जळगावच्या दोघा संशयीतांना एका संशयीताने नकली नोटांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. या संशयीतांच्या अटकेनंतर संशयीताने आतापर्यंत कुठे-कुठे नकली नोटांचा कुणाला पुरवठा केला आहे शिवाय या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहे? याबाबतचा माहिती कळणार आहे. भुसावळात पकडण्यात आलेल्या टोळीमुळे जिल्ह्यात नकली नोटा चलनात तर नाही ना? असादेखील प्रश्न नागरीकांना पडला असून पोलिसांनी या गुन्ह्याचा खोलवर तपास करावा, अशी अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !