भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व
भुसावळ (24 सप्टेंबर 2024) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा सांलनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व बियाणी मिलिटरी स्कूलद्वारा आयोजित शालेय 14, 17 व 19 वर्षा आतील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा उत्साहात झाल्या. अध्यक्षस्थानी बियाणे एज्युकेशनचे अध्यक्ष मनोज बियाणी व संगीता बियाणी होत्या. प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बोरसे, महाराष्ट्र क्रीडा शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.संजय निकम, तांत्रिक समिती सदस्य प्रा.मनोज वारके, डी.आर.धांडे, वंदना ठोके यांच्यासह शाळांचे क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. उद्योजक मनोज बियाणी यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन व श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूल आणि पब्लिक स्कूलचे वर्चस्व राहिले.
बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व
21 व 22 रोजी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूलवरुद्ध डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करत असताना डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल संघाने पाच षटकात 28 धावा केल्या. त्या बदल्यात बियाणी पब्लिक स्कूल संघाने पाच षटकात 29 धावा करून विजय संपादन केला. 17 वर्षे वयोगटात अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूलविरुद्ध डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना बियाणी पब्लिक स्कूल संघाने पाच षटकात 37 धावा केल्या. त्या बदल्यात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम संघाने पाच षटकात केवळ 16 धावा केल्या. 19 वर्ष वयोगटातील अंतिम सामना बियाणी ज्युनियर कॉलेज भुसावळ व पु.ओ.नाहाटा कॉलेज यांच्यात झाला. पाच षटकात या संघाने 31 धावा केल्या. बदल्यात बियाणी ज्युनिअर कॉलेजने फक्त नऊ चेंडू सामना जिंकला. तीन्ही गटात बियाणी स्कूलने आपलं वर्चस्व दाखवले. पंच म्हणून हिंमत पाटील, अजय अली, युसूफ खान व शुभम साळुंखे, रुपेश मोरे, विनय काळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा समन्वय डॉ.प्रदीप साखरे, हिंमत पाटील, नरेंद्र मस्के यांच्यासह बियाणी मिलिटरी स्कूलचे शिक्षक-कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

