श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर येथे आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक


यावल (27 सप्टेंबर 2024) : आगामी नवरात्रोत्सवात सातपुड्यात भाविकांची होणारी गर्दी पाहता प्रसाद विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटू नये तसेच दर्शनाकरीता येणार्‍या भाविकांशी उध्दट, उर्मटपणे बोलू नये अशा सुचना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी केल्या. संपूर्ण नवरात्रोत्सवात श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची चांगली व्यवस्था, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच वाहन तळ व संपुर्ण मंदिर परिसरात विशेष दक्षता घेऊन स्वच्छता ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. गुरूवारी मंदिरावर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यांची बैठकीला उपस्थिती
सातपुडा निवासिनी व संपूर्ण खान्देशसह राज्यभरातील असंख्य कुटूंबियांचे कुलदैवत असलेल्या आई मनुदेवी तीर्थक्षेत्रावर गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन, स्थानकप्रमुख जे.एस.सोळुंके, संस्थान अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व मंदिर संस्थानाची आढावा बैठक झाली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मंदिरासह परिसरात उत्सवादरम्यान कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. प्रसाद विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटू नये, भाविकांशी उध्दट-उर्मट पणे बोलू नये ज्यामुळे वाद उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. यात्रोत्सवादरम्यान संस्थेकडून कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती घेण्यात आली तसेच रस्त्याची स्थिती, दर्शन रांगा, मंदिर परिसरातील प्रसादाची दुकाने, भाविकांकडून अर्पण केल्या जाणार्‍या नारळासह विविध विधी करीता संस्थानाची व्यवस्था व संपुर्ण मंदिर व परिसरात स्वच्छतेकरीता कशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला

गुरे-ढोरे न बांधण्याच्या सूचना
आडगाव व कासारखेडा या दोन्ही ग्रामपंचायतीकडून श्री क्षेत्रावर येणार्‍या रस्त्याच्या कडेला असलेली उकीरड्यांना तत्काळ हटवण्याच्या सुचना देण्यात आल्या तसेच रस्त्याच्या कडे गावातील नागरीकांनी यात्रोत्सवादरम्यान गुरे-ढोरं बांधू नये, अशा सुचनादेखील देण्यात आल्या. प्रसंगी मंदिर संस्थानचे शिवाजी पाटील, नितीन पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, सतीष पाटील, महेश पाटील, मंडळाधिकारी एस.एस.पाटील सह आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !