शिरागड येथे तरुणावर प्राणघातक हल्ला : तिघांविरुद्ध गुन्हा
भंडार्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद
यावल (28 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील मनवेल येथे भंडार्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रुपांतर शिरागड गावात हाणामारीत झाले. 22 वर्षीय तरुणावर तिघांनी प्राणाघातक हल्ला करीत त्याच्या पाठीवर व कमरेवर धारदार वस्तूने वार करून त्याला जबर दुखापत करण्यात आली. ही घटना बुधवार, 25 सप्टेंबर रोजी रात्री घडली. यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला अटक करण्यात आली.
असे आहे मारहाण प्रकरण
शिरागड, ता.यावल येथील रहिवासी गणेश राजू सोळुंके (22) हा तरुण मनवेल, ता.यावल या गावात भंडार्याच्या कार्यक्रमात गेला असता नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रुपांतर शिरागड गावात हाणामारीत घडले. शिरागड गावात गणेश सोळुंके याला ताराचंद व्यंकट सोळंके, कैलास व्यंकट सोळंके व प्रशांत कैलास सोळंके या तिघांनी शिविगाळ करून मारहाण करीत त्याच्या पाठीला व कमरेला धारदार वस्तूने वार करीत जबर दुखापत केली. या तरुणाला जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून यातील ताराचंद सोळंके याला पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

