भुसावळात वयोवृद्धेला दमदाटी करीत पावणेदोन लाखांच्या बांगड्या लांबविल्या
भुसावळ (30 सप्टेंबर 2024) : रस्त्यावरून पायी चालणार्या वयोवृद्धेला दमदाटी करीत भामट्याने 22 ग्रॅम वजनाच्या व एक लाख 65 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या भामट्याने जबरीने हिसकावून पळ काढला. ही घटना शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता अशोक नगरातील अंगारा ढाब्याजवळ घडली. भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
तांत्रीबाई किसनचंद सुग (85, महेश नगर, भुसावळ) ही वयोवृद्धा शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील अशोक नगरातील अंगारा ढाब्याजवळून पायी जात असतांना अज्ञात व्यक्तीने दमदाटी करून त्यांना खाली पाडले व त्यांच्या हातातील एक लाख 65 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या जबरीने काढून पळ काढला. वयोवृद्धेने शनिवार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहे.

