विना परवाना मका खरेदी : बाजार समितीकडून व्यापार्‍यास 21 हजारांचा दंड


यावल (07 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील दहिगाव येथे रविवारी विनापरवाना मका खरेदी करतांना सावदा येथील एक व्यापारी आढळल्यानंतर त्याच्याकडे परवाना नसल्याने त्यास 21 हजार रूपये दंड बाजार समितीने ठोठावला. या कारवाईमुळे बोगस व विना परवाना शेतकर्‍यांची फसवणुकीच्या उद्देशाने शेतमाल खरेदी करणार्‍यांना चपराक बसली.

व्यापार्‍याला उमगली चूक : दंडही भरला
दहिगाव, ता.यावल येथे सावदा येथील व्यापारी शेख रईस शेख सलीम कुरेशी यांनी चढ्या भावाने मका खरेदी केला. या व्यापार्‍याकडे बाजार समितीचा परवाना नसल्याने संबंधित शेतकर्‍यांची बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे व सचिव स्वप्निल सोनवणे यांना याबाबत माहीती दिली. तत्काळ बाजार समितीचे पथक त्या ठिकाणी गेले व सदरील वाहन (क्रमांक एम.एच.19 ए.एफ. 5554) हे तेथून थेट यावल बाजार समितीत आणण्यात आले व संबंधित व्यापार्‍याला सावदा येथून बोलावून बाजार समितीचे सर्व नियम कसे आहेत ? हे सांगितले व विना परवाना खरेदी केली म्हणून त्यांना 21 हजार रुपये दंड करण्यात आला. झालेली चूक लक्षात येताच व्यापारी रईस शेख कुरेशी यांनी 21 हजार रुपये दंड भरणा केला व मक्याने भरलेले वाहन व्यापार्‍याच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !