बांगला देशातील संकटे दारापर्यंत ; भुसावळात शिरीष महाराज


भुसावळ (07 ऑक्टोबर 2024) : हिंदू बांधवांनी हिंदू समोरील संकटे ओळखावी, हिंदू बांधव झोपेत आहेत, त्यांनी उठून जागृत व्हावे, धर्माचे रक्षण करावे, संकटे आता आपल्या घरापर्यंत येऊ पहात आहे. यामुळे निद्रीस्त हिंदू बांधवांनी जागे होऊन रक्षण कसे करता येईल, याचा विचार करावा, पूर्वीच्या काळात आपली मंदिरे, मठ तोडली. महिलांवर अत्याचार केले. आता तरी आपण जागृत व्हावे, असे आवाहन जगतगुरू तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज यांनी त्यांच्या प्रवचनातून शहरात केले. शहरातील मातृभूमी चौकात शिरीष महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आले.

हिंदू समाजाने जागृत होण्याची गरज
शिरीष महाराज म्हणाले की, पूर्वी आपल्याच देशात हिंदूच्या महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करण्यात आले. आपली मंदिरे तोडली, मठ फोडले, देवांच्या मुर्त्या तोडल्यात, आपल्या पूर्वजांना याचा खूप त्रास सहन करावा लागला मात्र तरीही आपण अजून जागे झालेलो नाही, हिंदू समाजाने जागृत होण्याची गरज आहे. आता काळ बदलला आहे. त्यामुळे हिंदू समाजात जागृती होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हिंदूनी हिंदू बांधवासमोरील संकटे ओळखावी आणि जागृत व्हावे.

यांची होती उपस्थिती
मातृभूमी चौकात झालेल्या प्रवचनाच्या वेळी व्यासपीठावर धनराज महाराज अंजाळेकर व आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरात विठ्ठल मंदिराजवळ, मातृभूमी चौक, नाहाटा महाविद्यालय येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. नाहाटा महाविद्यालयात हिंदू संस्कृतीवर त्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवचनांचे आयोजन विठ्ठल मंदीर, राम मंदिर वॉर्ड तसेच मातृभूमी चौक या परिसरातील रहिवाशांनी व मित्र मंडळांनी आयोजन केले होते. यावेळी त्या परिसरातील रहिवाशांनी सहकार्य केले.

बांगला देशातील संकटे दारापर्यंत
बांगला देशात हिंदूवर झालेल्या अत्याचाराला आपण म्हणतो आपल्याला काय करायचे आहे मात्र हा अत्याचार बांगलादेशात झाला आहे मात्र आपण यापासून दूर आहोत असे म्हणतो मात्र हा अत्याचार आपल्या राज्यात, जिल्ह्यात व शहरात झाला तरी आपण म्हणतो आपल्याकडे काही झाले नाही मात्र ज्या वेळी आपल्या घरी जेव्हा अत्याचार घडतील, त्यावेळी आपल्याजवळ ओरडण्याशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले.

शिवाजी राजे नसते तर तुळस नसती
छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपल्या अंगणात तुळस नसती, घरावर छत नसते, आपल्याला धर्म परिवर्तीत करावा लागला असता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपण आजचे दिवस पाहू शकत आहोत, शंभुराजांवर औरंगजेबाने अत्याचार केले, मात्र, हिंदू धर्म कधीही परिवर्तीत केला नाही.

वारीवर केलेले अतिक्रमण
वारकर्‍यांच्या वारीवर हल्ली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण दूर करावे, वारी ही वर्षानुवर्षे निघत आहे. यात अन्य धर्मीय लोक सुध्दा येऊ लागले आहे. वारीला बदनाम केले जात आहे. अन्य धर्मीय लोक प्रचार करतात त्यामुळे आपणच आपल्या हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. जाती-पातीचे जोडे बाहेर काढून हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र यावे आणि धर्माचे रक्षण करावे, असे आवाहन महाराज यांनी विठ्ठल मंदिराजवळ झालेल्या प्रवचनातून केले. यावेळी भरत महाराज बेळीकर यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !