मी पाहिले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद : शेळगाव बॅरेज भेटीप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे


यावल (07 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील महत्वकाक्षी प्रकल्प असलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पास रविवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट दिली व कामाची पाहणी केली. सन 1999 साली या प्रकल्पास आपणचं मंजुरी दिली होती. व त्यास पुर्ण झालेला पाहून समाधान होत आहे असे त्यांनी सांगितले.

नऊ हजार कोटींवर गेली किंमत
रविवार, 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांनी यावल येथील माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील व कार्यकर्त्यांसह शेळगाव बॅरेजला भेट दिली. याप्रसंगी 1999 साली पाटबंधारे मंत्री असतांना तापी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून तापी नदीवर पाच बॅरेजला मंजुरी देण्यात आली होती. त्यातच शेळगाव बॅरेजचा देखील समावेश होता. भूमिपूजन करते वेळी शेळगाव बॅरेज या प्रोजेक्टची किंमत सुमारे 198 कोटी रुपये होती परंतु काम संथगतीने झाल्याने सदर प्रकल्पाची किंमत साधारण 08 ते 09 हजार कोटीपर्यंत गेली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

प्रकल्प पूर्णत्वास आल्याचा आनंद
या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अनेक लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला होता. आज या प्रकल्पास्थळी भेट दिल्यानंतर मनाला मानसिक आनंद झाला असून मी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास आल्याचा आनंद आहे. या प्रकल्पाच्या कामास 90 टक्के पूर्णत्वास आल्यामुळे यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यातील शेतीला व सिंचनासाठी उपयोग होणार आहे असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले.

याप्रसंगी यावल येथील माजी उपनगराध्यक्ष शेख असलम, रावेर येथील सुनील कोंडे, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किशोर माळी, प्रा.सुनील नेवे, जळगावचे माजी नगरसेवक सुनील माळी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रिंकू चौधरी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !