भुसावळात अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीने वेधले लक्ष


भुसावळ (07 ऑक्टोबर 2024) : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच दिवसीय शारदोत्सव झाला. या महोत्सवात विविध स्पर्धा, रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांचे स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. महोत्सवाचा समारोप सोमवारी भव्य-दिव्य विसर्जन मिरवणुकीने झाला. विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी अश्वारूढ अहिल्यादेवी व झाशीची राणी यांच्या स्वरूपातल्या विद्यार्थिनी होत्या. डीजेच्या तालावर एक संघपणे ठेका घेणार्‍या चिमुकल्या विद्यार्थिनींचे झेंडा पथक होते. या मिरवणुकीत गरबा पथक यांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. यावर्षीच्या शारदा उत्सवामध्ये देवीसमोर ष नारी तू नारायणी’ अशी महिला सशक्तीकरणाच्या संदर्भात आरास करण्यात आली.

पथनाट्यातून जनजागृती
शाळेतील विद्यार्थिनींनी महिला सशक्तीकरणावर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून अत्याचार झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे, गुन्हेगाराला कठोर शासन केले पाहिजे असा संदेश देण्यात आला. पथनाट्याने सर्व भुसावळकरांचे लक्ष वेधले. नऊवारी पातळ भगवा फेटा परिधान करून मराठमोळ्या रूपामध्ये झांज पथक व लेझीम पथकाने सादरीकरण केले. शाळेपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक जामनेर रोड, गंगाराम प्लॉट, डिस्को टावर, मरीमाता चौफुलीकडून विठ्ठल मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत विद्यालयातील साधारणत: 850 विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या पथकामध्ये समावेश होता. मिरवणुकीचा शुभारंभ संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांनी श्रीफळ वाढवून केला. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !