हतनूर धरण शंभर टक्के भरले : 110 गावांसह शहर व औद्योगिक प्रकल्पांना दिलासा
भुसावळ (08 ऑक्टोबर 2024) : हतनूर धरणाच्या पूर नियंत्रण आराखड्यानुसार धरणात 10 ऑक्टोबरदरम्यान शंभर टक्के जलसाठा केला जातो यंदा मात्र पाटबंधारे विभागाने नियोजनाच्या पाच दिवस आधीच अर्थात 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता धरणात शंभर टक्के जलसाठा केल्याने धरणावर अवलंबून असलेल्या 110 गावे, शहरे, प्रकल्प व औद्योगिक वसाहतींना आगामी वर्षभर मुबलक प्रमाणात व मागणीनुसार पाणी मिळणार आहे.
शंभर टक्के जलसाठा : टंचाई मिटली
हतनूर धरणात यंदाही उत्कृष्ठ नियोजनामुळे वेळेत जलसाठा होणार आहे. शनिवार, 5 ऑक्टोबर हतनूर धरणात शंभर टक्के जलसाठा करण्यात आला. नियोजनानुसार दरवर्षी 15 ऑक्टोंबरला शंभर टक्के जलसाठा होतो. यंदा मात्र पाच दिवस आगोदरच शंभर टक्के जलसाठा झाला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात सध्या दररोज 96 क्युमेक्स अर्थात तीन हजार 390 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. शंभर टक्के साठा करून होणार्या आवकमधून विसर्ग सुरू ठेवला जात आहे.

हतनूर धरण पूर्ण भरल्यामुळे धरणावर अवलंबून असलेली 110 गावे, भुसावळ, यावल, अमळनेर नगरपालिका, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र, मध्य रेल्वे भुसावळ, आयुध निर्माणी वरणगाव व भुसावळ, जळगाव व मलकापूर एमआयडीसी आदी प्रकल्पांनाही आगामी वर्षभरात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
दोन दरवाजांतून विसर्ग
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात परतीचा पाऊस झाला तर 100 टक्के जलसाठा कायम ठेवून विसर्ग केला जाईल. पूर व्यवस्थापनाच्या नियमांनुसार 10 ऑक्टोंबरपर्यंत जलपातळी 214 मीटर अर्थात 388 दलघमी जलसाठा करण्यात येईल व धरणाचे दोन दरवाजे दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग केला जात असल्याची माहिती शाखा अभियंता एस.जी.चौधरी यांनी दिली.
