यावल शहरात बसने घेतला पेट : प्रसंगावधानाने प्रवासी बचावले


Bus catches fire in Yaval city : Passengers are saved by chance यावल (09 ऑक्टोबर 2024) : यावल बसस्थानकाजवळील पंचायत समितीच्या समोर जळगाव विदगावमार्गे यावल जाणार्‍या एस.टी.बसने अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवत तातडीने प्रवाशांना खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र या आगीत बसचे मोठे नुकसान झाले.

अचानक पेटली बस
यावल आगाराची बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.1405) बुधवारी दुपारी एक वाजता प्रवासी घेवून जळगाव येथून विदगावमार्गे यावलकडे येत होती. शहरातील पंचायत समितीच्या प्रवेशव्दारासमोर मुख्य मार्गावर अचानक धूर निघायला सुरूवात झाली व अचानक बसने पेट घेतला. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास एकच खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने बस थांबवली व प्रवाशांना तत्काळ बसमधून खाली उतरवले. ही घटना अन्य ठिकाणी घडली असती तर मोठी जीवीतहानी झाली असती.

इंजिन गरम झाल्याने दुर्घटना
यावलचे आगारप्रमुख दिलीप महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा, असे प्राथमिक माहितीवरून दिसते. समय सुचकता बाळगत परिसरातील नागरीकांनी व नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या मदतीने बसची आग विझवण्यात यश आले. यावल आगारातील अनेक एसटी बसेस या पूर्णपणे नादुरुस्त व जीर्ण झाल्या असून एसटीचे ब्रेक निकामी होणे, वाहन बिघाड होवून कुठही बंद पडणे या घटना वारंवार होत आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाशी हा खेळ चालला असल्याची प्रतिक्रीया प्रवासी व्यक्त करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !