बोदवड पंचायत समितीत 37 लाखांचा अपहार : वरिष्ठ लेखा सहाय्यकाविरोधात गुन्हा
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार : संशयीताचे प्रशासनाकडून निलंबन
37 lakh embezzlement in Bodwad Panchayat Samiti : Crime against Senior Accounts Assistant भुसावळ (10 ऑक्टोबर 2024) : बोदवड तालुक्याचे मिनी मंत्रालय असलेल्या पंचायत समितीतील वरिष्ठ लेखा सहाय्यकाने विविध शिर्षकाखाली आलेल्या 37 लाख 27 हजार 989 रुपयांचा अपहार केल्याची बाब ऑडीटमध्ये समोर आली. याप्रकरणी संशयीत सहाय्यक लेखा अधिकारी संजय सीताराम पाटील याच्याविरोधात बोदवड पंचायत समितीत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयीताने मनरेगा, पीपीएफ यासह अन्य लेखा शिर्षकाखाली आलेल्या निधीत तत्कालीन चार तहसीलदारांच्या काळात अपहार केल्याचा संशय आहे.
असे आहे अपहारण
प्रकरण संशयीत संजय सीताराम पाटील हे बोदवड पंचायत समितीत 1 मे 2019 ते 25 एप्रिल 2023 या काळात वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर कार्यरत असताना त्यांनी काही रक्कम मुलाच्या खात्यावर वर्ग केली तसेच काही रक्कम स्वतःच्या खात्यावर वेळोवेळी वर्ग करीत शासकीय मालमत्तेचा अपहार करत शासनाची फसवणूक केली. ऑडीट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयीताने सात लाख 92 हजारांची रक्कम भरल्याची देखील प्राथमि माहिती आहे तर प्रशासनाने पाटील यांना निलंबित करीत त्यांची जळगावात बदली केली.

आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग होणार
पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी तसेच कृषी अधिकारी प्रदीप लोटू धांडे (52) यांनी याबाबत बोदवड पोलिसात 37 लाख 27 हजार 989 रुपयांच्या अपहार झाल्याची तक्रार दिल्यावरून संशयीत संजय पाटीलविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित पाटील करीत आहेत. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येत असून सखोल चौकशीअंती अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.
