यावलमध्ये रोडरोमिओंसह टारगटांवर होणार आता कारवाई
यावल शहरात शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पथकाकडून शहरातील शाळा, महाविद्यालय व बसस्थानकात गस्त
यावल (11 ऑक्टोबर 2024) : शहरातील विविध शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि बस स्थानकावर छेडखानी रोखण्यासाठी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पथकाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनंतर नेमणूक करण्यात आली. पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी साध्या गणवेशात विविध भागात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी टवाळखोरांवर गोपनीय लक्ष ठेवून आता कारवाई करणार असल्याने विद्यार्थिनी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
टवाळखोर येणार वठणीवर
शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तसेच विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थिनी येतात. माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थिनी बस स्थानकावरून विविध भागात शिक्षणासाठी जाताा मात्र नेक ठिकाणी छेडखानीचे प्रकार घडतात म्हणून अप्रिय प्रकार टाळण्यासाठी व विद्यार्थिनींना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पथकाची स्थापना केली आहे. या पथकात फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या नियंत्रणात महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी तडवी, सपना सोनवणे, अर्षद गवळी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर कर्मचार्यांच्या मदतीने शहरातील शाळा, विद्यालय, महाविद्यालय परिसरात हे कर्मचारी शालेय वेळेनुसार गस्त घालत आहेत.

