मोदी, शहांचा फोटो म्हणजे पराभवाची गॅरंटी : उद्धव ठाकरेंचा घणाघात


जालना (8 नोव्हेंबर 2024) : महाराष्ट्रात सर्वच पक्षांवरील पोस्टरवर हिंदुहृदयसम्राटांचा फोटो आहे. भाजपच्या पोस्टवर कदाचित मोदींचा, अमित शहांचा फोटो नसेलच. कारण त्यांचा फोटो म्हणजे हमखास पराभवाची गॅरंटी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

गद्दार सुरतला पळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर नामकरण केले
अमित शहांना काय बोलायचे ते मी बोललो. हा माणूस देशाच्या गृहमंत्री पदावर राहू शकतो का? औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करायला बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरेंचा विरोध आहे, असे शहा म्हणाले पण कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण आपण केले. हे गद्दार सुरतला पळाले होते. हे ढोकळा खात असताना आपण नामकरण केले. आम्ही छत्रपती संभाजी महाराज चिकलठाणा विमानतळ असे नामकरण सुद्धा आम्ही केले होते. मग आता तुम्ही ते करत नाहीत, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदी आणि शहा भाजपवाल्यांना मलम लावायला आलेत
नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत फटकारे दिल्यानंतर मोदी आणि शहा भाजपवाल्यांना मलम लावायला आले आहेत. काही जणांना त्यांचे वळ दाखवायलाही लाज वाटत आहे. मोदी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या गाडीला ब्रेक नाहीत. कारण आमची गाडी दिल्लीपर्यंत सुसाट जाणार आहे. पण तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची लागलेली चाके या निवडणुकीत पंक्चर होणार आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

भाजप शिंदे,अजित पवारांना त्यांची भांडी घासायला लावणार
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असे अमित शहा म्हणाले. आता शिंदे आणि अजित पवारांनी ठरवावे, भाजप वापरा आणि फेका कसे करते, हे त्यांनी पहावे. भाजप तुम्हाला त्यांची भांडी घासायला लावते का नाही, ते बघा, असा टोलाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना लगावला.


कॉपी करू नका.