भुसावळात भरदिवसा अवघ्या 20 मिनिटात घरफोडी करीत भामटे चारचाकीतून पसार

भुसावळात शिव कॉलनीत भर दिवसा पडलेल्या घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये घबराट : हायप्रोफाईल चोरट्यांची निरीक्षकांना कडक सलामी


भुसावळ : भुसावळकरांना रात्रीच्या चोर्‍या-घरफोड्या नवीन नाहीत मात्र शनिवारी भर दिवसा सुटा-बुटात आलेल्या हायप्रोफाईल चोरट्यांनी अपार्टमेंटमधील बंद घराला लक्ष्य करीत लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 20 मिनिटात चोरट्यांनी आपले काम फत्ते करीत लाखोंच्या ऐवज लांबवत चारचाकीतून पोबारा केला. भुसावळकरांनी अशा पद्धत्तीने चोरीचा ट्रेण्ड प्रथमच अनुभवला आहे. चोरट्यांना शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे तर अवघ्या 24 तासांपूर्वीच बाजारपेठ पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासाठी चोरट्यांची ही धाडसी घरफोडी कडक सलामी ठरली आहे.

चारचाकीतील चोरट्यांची दाखवली कमाल
बिल्डींग मटेरीयलचे सप्लायर्स रघुनाथ चुडामण चौधरी (55) हे कुटुंबातील सदस्यांसमवेत महामार्गाजवळील शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. या अपार्टमेंटमध्ये नऊ परीवार वास्तव्यास आहेत. चौधरी कुटुंबातील सदस्य हे शनिवारी श्री क्षेत्र शिरसाळा येथे देव दर्शनासाठी गेल्याने कुटुंबातील मोठी सून घरी होत्या मात्र त्याही शेजारीच असलेल्या नातेवाईकांकडे गेल्याने प्लॅटला कुलूप होते. दुपारी 12.30 ते एक वाजेच्या दरम्यान पांढर्‍या रंगाच्या चारचाकीतून हायप्रोफाईल चोरटे आले. त्यातील तिघे गाडीखाली उतरले तर एकाचा मात्र मोबाईलवरून संवाद सुरू असल्याचे गल्लीतील नागरीकांनी पाहिले मात्र कुणाकडे तरी पाहुणे आले असावेत! असे नागरीकांना वाटल्याने ते चोरटे असल्याचा अंदाज आला नाही. तिघांनी पहिल्या मजल्यावरील चौधरी यांच्या बंद घराला टार्गेट करीत कपाटातील दोन लाखांची रोकड, 13 ग्रॅमचे प्रत्येकी दोन नेकलेस, अंगठ्या, लहान मुलांचे दागिने, कानातले टॉप्स असा लाखोंचा मुद्देमाल लांबवल्याचे चौधरी यांनी सांगितले.

धर्मदाय आयुक्तांचे घर बचावले
रघुनाथ चौधरी यांच्या फ्लॅटसमोरच जळगाव धर्मदाय आयुक्त विजय दिनकरराव नेमाडे व अ‍ॅड.राधिका नेमाडे-वाणी राहतात. हे कुटुंबही बाहेरगावी असल्याने कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधण्याचा प्रयत्न केला मात्र डबल कुलूप असल्याने त्यात त्यांना यश आले नाही त्यामुळे अपार्टमेंट दुसर्‍या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसलेला दिसून आला.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
भर दिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे अपार्टमेंसह परीसरातील नागरीकांमध्ये मोठी घबराट पसरली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहा.निरीक्षक हरीष भोये यांच्यासह बाजारपेठ डीबी स्टाफने धाव घेत पाहणी केली. पोलिस उपअधीक्षकांनी घरातील सदस्यांसह अन्य नागरीकांशी संवाद साधून घडलेल्या नेमक्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.

परीसरात सीसीटीव्हीचा अभाव
चोरी घडली त्या अपार्टमेंटसह परीसरात जवळपास कुठेही सीसीटीव्ही नसल्याने चोरटे नेमक्या कोणत्या वाहनात आले, त्याचा रंग, वाहनाचा क्रमांक कळण्यास पोलिसांना अडचणी आल्या मात्र स्थानिक नागरीकांकडून मिळत असलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांकडून डाटा जमवला जात असून त्यानुसार तपासाची पुढील दिशा ठरवली जात आहे. दरम्यान, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, संतोष (दाढी) चौधरी यांनीदेखील भेट देवून माहिती जाणून घेतली.

ठसे तज्ज्ञांसह डॉग स्कॉडला पाचारण
घरफोडीच्या तपासासाठी जळगाव येथे ठसे तज्ज्ञांसह डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घरफोडी झालेल्या बिल्डींगभोवती चक्कर मारला व त्यानंतर तेथे तेथेच घुटमळले. दरम्यान, घरफोडी झालेल्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग असल्याने सहज पळून जाण्यास मदत होण्यासाठी चोरट्यांनी या भागाची निवड केली असावी? असा अंदाज आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !