रावेर विधानसभेत अमोल जावळे यांचा विजय निश्चित : मंत्री रक्षाताई खडसे
रावेर (15 नोव्हेंबर 2024) : केंद्रासह राज्याच्या महत्वकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचल्या असून रावेर विधानसभेत महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे निश्चित विजयी होतील, असा आशावाद मंत्री रक्षा खडसे यांनी रावेर तालुक्यातील प्रचारादरम्यान व्यक्त केला. याप्रसंगी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा आशावाद व्यक्त केला.
विविध गावांमध्ये बैठका
रावेर विधानसभेतील भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये मंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रचार दौरा केला. यावेळी पदाधिकार्यांसोबत त्यांनी कॉर्नर बैठका घेत संवाद साधला तसेच मतदारांशी संवाद साधून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले.
या गावांमध्ये दिल्या भेटी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत रावेर विधान सभेसाठी भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ रावेर तालुक्यातील पाल, गुलाबवाडी, मोरव्हाल, जिन्सी व लालमाती आदी गावांमध्ये मंत्री रक्षा खडसे यांनी अलीकडेच भेट दिली.
भाजपा शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख, महायुती पदाधिकारी तसेच मतदारांशी प्रत्यक्षपणे त्यांनी संवाद साधला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.