भुसावळात कर्नाटक एक्सप्रेसमध्ये 60 हजारांचा गुटखा-जर्दा जप्त
एका आरोपीला अटक : भुसावळ लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी
भुसावळ (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : अप 12628 कर्नाटक एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर भुसावळात संयुक्त कारवाईत गाडी येताच उमेश वर्मा (42, रा.गणेश तलई, खंडवा, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 60 हजारांचा गुटखा व जर्दा जप्त करण्यात आला. सातत्याने रेल्वेतून गुटखा तस्करीच्या कारवाया होत असल्याने तस्कर हादरले आहेत.
असा साठा जप्त
‘तुलसी रॉयल जाफरानी जर्दा’चे 120 पाउच, ‘प्रीमियम राजनिगंधा’चे 32 बंडल मिळून एकूण 60 हजार 280 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे रेल्वेमार्गावरील अवैध तंबाखू वाहतुकीवर आळा बसत असल्याचे दिसून येत आहे.



यांनी केली कारवाई
ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक दीपक तायडे, एएसआय शिवानंद गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, एएसआय नितीन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज लुळे, जय कोळी, विलास जाधव, अंकुश लांडगे, पोलीस हवालदार बाबू इमाम बेग, नूर बेग मिर्झा, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक अनुज जगपाल सिंग आदींच्या पथकाने केली.