20 हजारांची लाच घेताना दोन वनरक्षकांसह वनपाल जाळ्यात

रेती उपसा व वाहतुकीवरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


गोंदिया (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : रेती उपसा व वाहतुकीबाबत कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन विभागातील वनपालास दोन वनरक्षकांना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गोंदिया जिल्ह्यातील परसटोला परिसरातील राजुली सावनक्षेत्र वनपरिक्षेत्र कार्यालयात मंगळवारी करण्यात आली.

वनपाल रमेश सखारामजी पचारे (57, राजुली सावनक्षेत्र वनपरिक्षेत्र, गोठणगाव), वनरक्षक निलोत्पल हिरालाल शिकारे (31, पारसटोला वनपरिक्षेत्र) व वनरक्षक चिंटू मंगलसिंग परिहार (38, राजुली सावनक्षेत्र वनपरिक्षेत्र) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.




25 हजारांपासून 20 हजारांवर तडजोड
तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरू असून, मार्च 2026 मध्ये घरासाठी आवश्यक रेती गावाशेजारील नाल्यातून आणत असताना वन विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडवला होता. रेती उपसा व वाहतुकीबाबत कारवाई करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर 9 जुलै रोजी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पुन्हा अडवून त्याची चावी काढून घेण्यात आली. घराचे बांधकाम सुरू झाल्यापासून पैसे दिले नसल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी तक्रारदाराला 8 ऑगस्ट रोजी पारसटोला राऊंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. तेथे संबंधित अधिकार्‍यांनी ‘सेटलमेंट’ करण्याचे सांगून 25 हजारांऐवजी 20 हजार रुपये देण्याची मागणी केली.

एसीबीकडे तक्रार; पडताळणीत मागणी स्पष्ट
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 10 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान तक्रारदाराला पंच व व्हॉइस रेकॉर्डरच्या सहाय्याने संबंधित अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले. यावेळी तक्रारदाराविरुद्ध रेती उपसा व वाहतुकीबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती एसीबीने दिली.

20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
पडताळणीत लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराला पंचांसह लाचेची रक्कम घेऊन संबंधित कार्यालयात पाठविण्यात आले. यावेळी आरोपी क्रमांक एक असलेल्या वनपाल रमेश पचारे यांनी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक दोन व तीन हेही घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध किशोरी पोलीस ठाणे, जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, एएसआय करपे, हेड कॉन्स्टेबल बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले, डांगे आदी सहभागी झाले.

नागरिकांना एसीबीचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !