प्रचार तोफा थांबल्या : भुसावळात आज निवडणूक साहित्याचे वितरण
गुप्त बैठकांसह भेटीगाठींवर जोर : 19 बसेस, 110 खाजगी वाहने अधिग्रहीत
Propaganda guns stopped : Distribution of election materials today in Bhusawal भुसावळ (19 नोव्हेंबर 2024) : गेल्या चार आठवड्यांपासून विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. आता राजकीय पक्षांकडून भेटीगाठी व गुप्त बैठकांद्वारे मतदारांशी संवाद साधला जात असून बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी होणार्या निवडणुकीकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, भुसावळात मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासूनच मतदान साहित्य वाटपाला सुरूवात होणार आहे तर कर्मचारी 318 मतदान केंद्रावर साहित्यासह रवाना होतील. निवडणुकीसाठी 19 एस.टी.बस, 110 खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे तर मतदान प्रक्रियेत एक हजार 755 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
भुसावळात आज साहित्याचे वाटप
भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात निवडणूक प्रक्रियेतील कर्मचार्यांना मतदान साहित्य मंगळवार, 19 रोजी सकाळी आठ वाजेपासून तहसील कार्यालयाच्या आवारातून वितरीत केले जाणार आहे. यासाठी येथे 26 टेबल विविध फॉर्मचे लावले जाणार आहे. कर्मचार्यांनी तेथून फॉर्म व अन्य मतदान साहित्य घेऊन मतदान यंत्रे सोबत घेत त्यांच्या नेमणुकीच्या गावाला मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत पोहोचायचे आहे. तहसीलदार तथा सहायक अधिकारी निता लबडे, निवडणूक नायब तहसीलदार डॉ.अंगद आसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहे.

318 केंद्रावर कर्मचारी होतील रवाना
विधानसभा निवडणुकीसाठी लागणार्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी लागणार्या बस, लहान वाहने आदी असतील. मतदार संघातील 318 मतदान केंद्रावर होणार्या मतदानासाठी साहित्य व अधिकारी, कर्मचारी यांना ने-आण करण्यासाठी 19 बस, 110 खासगी वाहने, 36 वाहने ही सेक्टर अधिकार्यांसाठी, तीन भरारी पथकासाठी चार स्थिर सर्व्हेक्षण पथकांसाठी असतील.
ही आहेत आदर्श मतदान केंद्र
भुसावळ मतदारसंघात 318 मतदान केद्रांपैकी 11 मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्रे असतील. यात तीन मतदान केद्रे ही महिला अधिकारी, कर्मचारी यांचीच येथे नियुक्ती असेल. यात कोटेचा महाविद्यालय, एन.के.नारखेडे शाळा, पत्री शाळा व गोजोरे येथील जिल्हा परिषदेची शाळा येथे महिलाराज असेल. दिव्यांग मतदारांसाठी पु.गं.बर्हाटे व पालिकेची शाळा नंबर 35 ही स्वतंत्र केद्रे राहणार असतील व 25 वयोगटाच्या आतील अधिकारी असलेले युवा मतदान केंद्र म्हणून के.नारखेडे विद्यालय असेल. ग्रामीण भागात भानखेडा जिल्हा परिषद शाळा, जाडगाव, टहाकळी, किन्ही व आदर्श हायस्कूल भुसावळ हे आदर्श केंद्रे आहेत.
चक्रीका मोबाईल अॅप नवीन
निवडणूक प्रक्रीयेत जे कर्मचारी, अधिकारी नियुक्त केले आहे, त्या कर्मचार्यांच्या मोबाईलमध्ये चक्रीका मोबाईल अॅप डाऊन लोड करण्यात आले आहे. यात संबंधितांनी त्यांचे नाव, मतदान केंद्र याची माहिती भरायची आहे. ज्या वेळेस कर्मचारी, अधिकारी हे मतदान यंत्रे, साहित्य घेऊन तहसील कार्यालयातून निघणार आहे, त्यावेळेपासून जीपीएसद्वारे कर्मचारी कुठे गेले, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांना चक्रीका अॅपद्वारे कळणार आहे. कर्मचारी कोठे गेला? याची माहिती सुध्दा अधिकार्यांना मिळेल. यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने हे अॅप आणले आहे.
वोटर स्लीपचा घोळ कायम
शहरातील अनेक भागातील मतदारांना अद्यापही निवडणूक विभागातर्फे वोटर स्लीप वाटप करण्यात आली नसल्याची तक्रार आहे. दर निवडणुकीत मतदारांना हा अनुभव येत असल्याने अनेक मतदार या स्लीपमुळे मतदानापासून वंचित ठरत असल्याने दोन दिवसात ज्या मतदारांना वोटर स्लीप मिळालेली नाही, अशापर्यंत ती स्लीप पोहोचवावी, अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत आहे.
