मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटलांना लाडक्या बहिणींची साथ : विजयानंतर आमदारांवर फुलांची उधळण
विजयानंतर महायुतीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष : शहरभरात सर्वत्र उधळला विजयाचा गुलाल
मुक्ताईनगर (24 नोव्हेंबर 2024) ः संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गडाला दुसर्यांदा सुरूंग लावण्यात आमदार चंद्रकांत पाटील यशस्वी झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांना एक लाख 12 हजार 318 तर प्रतिस्पर्धी अॅड.रोहिणी खडसे यांना 88 हजार 414 मते मिळाली. 23 हजार 904 मते मिळवून आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरात विजयी झाले. विशेष म्हणजे गत 2019 च्या विधानसभेत अवघ्या एक हजार 957 मतांनी आमदार पाटील यांचा विजय झाला होता मात्र यावेळी त्यांनी लीड अधिक घेत खडसेंच्या बालेकिल्ल्यातील वर्चस्वाच्या बुरूजालाही धक्का दिला.
अपक्षांसह वंचितलाही मतदारांनी दाखवली जागा
मुक्ताईनगरात अपक्षांची भाऊगर्दी वाढली होती तर आमदार चंद्रकांत पाटील व अॅड.रोहिणी खडसे यांच्या नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभे करण्यात आले होते शिवाय वंचितनेही येथे उमेदवार दिला होता मात्र सुज्ञ मतदारांनी सर्वांनाच पराभवाचा धक्का दिला. राज्यातील सर्वाधिक चुरशीची लढत येथे असल्याने मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आमदार एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व मुक्ताईनगरात असल्याने त्यांच्या वर्चस्वाला दुसर्यांदा सुरूंग लावण्यात आमदार चंद्रकांत पाटील येथे यशस्वी झाले आहेत.

गोळीबारामुळे मतदारसंघ चर्चेत
2019 च्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेल्या अॅड.रोहिणी खडसे महाविकास आघाडीकडून तिकीट जाहीर करण्यापूर्वीच येथे कामाला लागल्या होत्या शिवाय आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात पत्रक बाजीवरून नेत्यांमध्ये चांगलेच युद्धदेखील पहायला मिळाले शिवाय सामाजिक समीकरणे असलेले अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीने संजय ब्राह्मणे तर शासकीय कंत्राटदार म्हणून ख्याती असलेले विनोद सोनवणे नशीब आजमावत होते. बोदवडच्या प्रचार दौर्यात विनोद सोनवणे यांच्यावर त्रिकूटाने गोळीबार केल्याने मतदारसंघ राज्यात प्रकाशझोतात आला व त्यानंतर जिल्हाभरात उमेदवारांना पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची वेळ आली. नेत्यांच्या सभेतून एकमेकांवर टीकेचे बाणही चालवण्यात आले.
लाडक्या बहिणींची भाऊ चंद्रकांत पाटलांना साथ
मुक्ताईनगरात प्रचाराच्या आधीच मुख्यमंत्री हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुक्ताईनगरात येऊन गेले. त्यानंतर अभिनेता गोविंदा यांचा रोड शो देखील गाजला तर अॅड.रोहिणी खडसे यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली तर खासदार अमोल कोल्हे यांनी रोड शो केला. महायुतीकडून निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना लागू करण्यात आली व तिचा मोठ्या प्रमाणावर प्रचार, प्रसार झाल्याने लाडक्या भावासाठी अर्थात आमदार पाटील यांच्यासाठी बहिणी धावून आल्या शिवाय मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच हजार कोटींची कामे केल्याचे सभेत सांगून आमदारांना बळ दिल्याने त्याचाही प्रभाव निवडणुकीत दिसून आला. महायुतीतील भाजपा पदाधिकार्यांनी निष्ठेने खडसेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची येथे शिकस्त केली हेही विशेष !
जेसीबीतून फुलांची उधळण : आमदारांचा जयघोष
आमदार चंद्रकांत पाटील यांना विजयी घोषित केल्याानंतर मुक्ताई नगरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळत शिवसैनिकांनी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आमदारांच्या विजयाचा यावेळी जयघोष करण्यात आला तर जेसीबीतून फुलांची उधळण करून आमदारांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
हा जनतेचा व कार्यकर्त्यांचा विजय : आमदार चंद्रकांत पाटील
माझा हा एकट्याचा विजय नसून मतदारसंघातील जनतेचा व यशासाठी मेहनत घेतलेल्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, अशी भावना आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
पराभव आम्ही मान्य करतो : एकनाथराव खडसे
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव नसणे आदी मुद्दे विधानसभा निवडणुकीत गौण ठरले. लाडकी बहिण योजना वरचढ ठरली मात्र पराभव हा पराभवच असून तो आम्ही मान्य करतो, असे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले.




