जळगावात तीन लाखांचे एम.डी.ड्रग्ज जप्त : स्थानिक आरोपीला अटक

मालेगावातील पुरवठादाराविरोधात गुन्हा : गुन्हे शाखा व जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई


MD drugs worth ₹3 lakh seized in Jalgaon; local accused arrested जळगाव (शुक्रवार, 31 जुलै 2026) : जळगावात एम.डी.ड्रगची खेप येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस दलाला मिळाल्यानंतर संयुक्त कारवाईत स्थानिक आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून 62.07 ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले. आरोपीने हे ड्रग्ज मालेगावच्या पुरवठादाराकडून आणल्याची कबुली दिल्याने या आरोपीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण तीन लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुरुवार, 31 जुलै) रोजी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंड, सेक्टर क्रमांक 14 च्या समोरील रस्त्यावर एम.डी.ची वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार एम.आय.डी.सी.पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. अंग झडतीत मानवी शरीरास अत्यंत घातक असणारा ‘एमडी’ हा अंमली पदार्थ आढळला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (36, मूळ रा.आडगाव, ता.जळगाव, सध्या रा.करीमनगर, फातिमा नगर, एमआयडीसी, जळगाव) असे असून आरोपीने हे ड्रग्ज रफीक उर्फ गोल्डन (रा.मालेगाव, जि.नाशिक) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याने त्याच्याविरोधातही एएसआय अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 39.06 ग्रॅम एमडी (किंमत 1.96 लाख), 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी (किंमत 36 हजार) आणि 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी (किंमत 56 हजार) असा एकूण 62.07 ग्रॅम एमडी (एकूण किंमत 2.88 लाख) जप्त केला. याशिवाय रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (20 हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (50 हजार) असा एकूण 3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक नितीन गणापुरे, यांच्या मार्गर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार मुरलीधर धनगर, हवालदार अकरम शेख, हवालदार योगेश घुगे, हवालदार प्रवीण भालेराव, हवालदार किशोर पाटील, हवालदार विजय पाटील, कॉन्स्टेबल छगन तायडे, कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळ, कॉन्स्टेबल राहुल रगडे तसेच फॉरेन्सिक युनिटचे हवालदार अमित माळी, हवालदार संघपाल तायडे आदींच्या पथकाने केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !