भुसावळात घरफोडी करणार्‍या जावयाकडून पोलिसांना तपासाची विचारणा : पत्नीचा जवाबानंतर संशय बळावताच पडल्या बेड्या

कर्जबाजारी झाल्याने सासर्‍याकडे चोरी केल्याची आरोपीची कबुली : बाजारपेठ पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा


भुसावळ (7 डिसेंबर 2024) : सोमनाथ नगरात 28 लाखांच्या घरफोडी प्रकरणात तक्रारदारासोबत आलेला जावई सातत्याने चोरीबाबत पोलिसांना तपासाची दिशा विचारत होता शिवाय मेहंदी कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी असलेल्या जावयाच्या पत्नीने दोन ते तीन तास पती कार्यक्रमात हजर नसल्याचा क्लू पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांना क्लू मिळाला व जावयाचा बेड्या पडल्या. 28 लाख 55 हजारांच्या घरफोडी प्रकरणी आरोपीच्या ताब्यातून 21 लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जळगावात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी सायंकाळी दिली. राजेंद्र शरद झांबरे (29, फेकरी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खलबत्त्यातून लांबवले दागिणे
शहरातील लोखंडे वाडा, शिवशक्ती कॉलनीजवळील सोमनाथ नगरातील रहिवासी व इलेक्ट्रीशीयन अनिल हरी बर्‍हाटे हे सेवानिवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नीसोबत पुतण्याच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी शहरातील वांजोळा रोड, मिरची ग्राऊंड परिसरात आल्याने चोरट्यांनी सोमवारी दुपारी पावणेतीन वाजेनंतर संधी साधली होती. 25 तोळ्यांचे दागिणे व एकूण तीन लाख 80 हजारांची रोकड चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून लांबवली होती. विशेष म्हणजे स्नानगृहाच्या वरील अडगळीच्या जागेत ठेवण्यात आलेल्या खलबत्त्यातून चोरट्यांनी दागिणे लांबवल्याने ही चोरी माहितगाराने केल्याचा सुरूवातीपासून यंत्रणेला संशय होता व तो खरा ठरला.

कर्ज वाढल्याने सासर्‍याकडेच केली चोरी
पोलिसांनी धाडसी घरफोडीनंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासले तसेच खबर्‍यांना अ‍ॅक्टीवेट केले तसेच मेहंदी कार्यक्रमात कोण-कोण नातेवाईक आले याची माहिती जाणली. आरोपी राजेंद्र शरद झांबरे यांच्या पत्नीचाही जवाब नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी संशयीत दोन तास कार्यक्रमात नसल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला व संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोपटासारखी चोरीची कबुली देत कर्ज वाढल्याने कृत्य केल्याचे सांगितले. संशयीतांने यापूर्वीच अडगळीत ठेवण्यात आलेल्या खलबत्त्यातून वेळोवेळी साडेसात लाखांचे 100 ग्रॅम सोने लांबवल्याचेही कबुल केले. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 23 तोळे पाच ग्रॅम वजनाचे दागिणे तसेच दोन लाख 60 हजारांची रोकड मिळून 21 लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत : पोलिसांना विचारला जाब
भुसावळात गेल्या काही महिन्यात झालेल्या सर्वात मोठ्या घरफोडीपैकी अनिल बर्‍हाटे यांच्याकडे झालेली घरफोडी ही तब्बल 28 लाखांची व भर दिवसा असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. संशयीत राजेंद्र शरद झांबरे (फेकरी, ता.भुसावळ) हे जावई असल्याने त्यांचे बर्‍हाटे यांच्याकडे जाणे-येणे होते व खलबत्त्यात दागिणे लपवल्याची बाब त्यांना ठावूक असल्याने त्यांनी वेळोवेळी सोने चोरले व घराच्या खिडकीचे गज कापण्यास सुरूवात केली. मेहंदी कार्यक्रमात वयोवृद्ध दाम्पत्य येताच आरोपीने संधी साधून घरफोडी घरातील सर्वच मुद्देमालावर डल्ला मारला. घरफोडीनंतर आरोपी सातत्याने पोलिसांना तपास कुठवर आला याची सातत्याने विचारणा करताना दिसून येत होता हेदेखील विशेष!

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, नाईक सोपान पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल जावेद शहा आदींच्या पथकाने केली.

दागिणे, रोकड लॉकरमध्ये सुरक्षित ः पोलीस उपअधीक्षक
लाखो रुपये किंमतीचे दागिणे तसेच मोठ्या प्रमाणावर रोकड नागरिकांनी घरात न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले आहे. नागरिकांनी बाहेरगावी जाताना नजीकच्या पोलिसांनाही सूचित करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !