भुसावळात सोन पाऊलांनी आलेल्या श्री महालक्ष्मीची उत्साहात स्थापना
घरोघरी ज्येष्ठा गौरींचे भक्तिभावाने पूजन ; विविध नैवेद्य, हळदी-कुंकू व महाप्रसादाने धार्मिक वातावरण
भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : गेल्या सोमवारी श्री गणपती बाप्पांचे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गौरींची स्थापना करण्यात आली. गौरींच्या आगमनामुळे विशेषतः गृहिणींची लगबग वाढली आहे. घराघरांत आकर्षक सजावट, आरास आणि पूजाविधीची तयारी करण्यात आली होती. तीन दिवसांचा कौतुक सोहळा भाविकांकडून अत्यंत भक्तिभावाने केले जाते. गौरींच्या पूजनासाठी जाई-जुई, शेवंती, जास्वंद, मोगरा, गोकर्ण, करदळी, चाफा आदी विविध फुलांसह आघाडा, शमीपत्री, दुर्वा आणि फुलांचे हार अर्पण करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा-अर्चा करून गौरींचे स्वागत करण्यात आले.
गौरींच्या आगमनानंतर दुसर्या दिवशी महालक्ष्मी भोजनाचा विशेष नैवेद्य दाखविण्यात आला. यामध्ये पुरणावरणासह विविध प्रकारच्या सोळा भाज्यांचा समावेश होता. पडवळ, आंबटचुका, चाकवत, अंबाडी, गंगाफळ, गिलके, दोडके, भोपळा, टोमॅटो, तोडले, चवळी, गवार, वाल, श्रावणघेवडा, शेपू, पोकळा, ढेमसे आदी पारंपरिक भाज्यांसह अनारसे, करंजी, सांजोरी, मोदक, लाडू, शेव, चिवडा, चकली, विविध चटण्या, कोशिंबीर, अंबील आणि पंचामृताचा नैवेद्य करण्यात आला.

या काळात सुवासिनी महिलांनी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून एकमेकींना सौभाग्याचे वाण दिले. रात्री गौरींच्या कथा-कहाण्या, जागरण आणि धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दररोज धूप, दीप आणि आरतीमुळे घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धुपाच्या सुगंधाने परिसर दरवळत असून सर्वत्र धार्मिक वातावरण अनुभवास येत होते.
तिसर्या दिवशी पारंपरिक पद्धतीने मुरड कानवले आणि दहिभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून श्री महालक्ष्मी गौरींचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पांचे आगमन आणि त्यानंतर ज्येष्ठा गौरींचे आगमन यामुळे कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार एकत्र आल्याने घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बाहेरगावी नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या चाकरमान्यांनीही गौरी पूजनासाठी आपल्या गावी हजेरी लावल्याने घरातील वडीलधार्या मंडळींचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महालक्ष्मी भोजनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. परंपरा, श्रद्धा आणि कौटुंबिक स्नेह यांचा सुंदर संगम घडवून आणणार्या या उत्सवामुळे भुसावळ शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.


