भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन समारोह उत्साहात
भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : स्व.बाबासाहेब के.नारखेडे यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा तर शिक्षकांसाठी कथा व काव्यलेखन स्पर्धा तसेच नवसाहित्यिकांसाठी कथासंग्रह, काव्यसंग्रह व कादंबरी राज्य पुरस्कार पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन समारोह शहरातील प्रभाकर हॉलमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळाचे विद्यमान अधिष्ठाता प्रा.डॉ. साहेबराव भूकन होते. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत 440 विद्यार्थी स्पर्धकांनी तसेच 109 नवसाहित्यिकांनी सहभाग घेतला.

प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.एस.ए.अडकमोल यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचा परिचय व सत्कार सोहळा झाला. कार्यक्रमात विद्यालयाच्या पालवी या वार्षिक नियतकालिकाच्या ज्ञानकर्मी स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे जन्मशताब्दी वर्ष विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांचे नमुना वक्तृत्व व सुगम संगीत सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी क्षमता अधिक विकसीत कराव्यात
प्रमुख अतिथी प्रा.डॉ.साहेबराव भुकन यांनी विद्यार्थी व शिक्षकांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजनाबद्दल शाळा व संस्थेचे कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणातून विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता अधिकाधिक विकसित कराव्या आणि तंत्रज्ञानाचा वापर साधन म्हणून करावा, असे मार्गदर्शन केले. नवसाहित्यिकांनी स्वतःशी स्पर्धा करत अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न करावे. साहित्य माणसाला संवेदनशील व्हायला शिकवतं. ‘जो सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवतो तोच खरा यशस्वी माणूस’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांचे प्रमुख मनोज तडवी, शिक्षक व नवसाहित्यिकांसाठी आयोजित स्पर्धा व राज्य पुरस्कारांचे प्रमुख नितीन पाटील व वार्षिक नियतकालिक पालवी संपादक मनोज कुळकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात शिल्पा प्रवीण ढोमणे यांच्या रेवडी या कथासंग्रहाला, निशा पराग काळे यांच्या ‘तुझा कस्तुरी स्पर्श’ या कवितासंग्रहाला आणि अंजली अरुण पांडे यांच्या ‘कहाणी जिद्दीची’ या कादंबरीला स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मेहनतीतील सातत्य व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हेच खरे यशाचे गमक असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, भाग्येश मकरंद नारखेडे, संस्था सदस्या अर्चना मकरंद नारखेडे, शैलजा रमाकांत फालक, श्वेता भाग्येश नारखेडे, संस्था सदस्य पी.ई.नेमाडे, प्रभाकर हॉलचे मालक चेतन पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.एस.ए.अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.एल.राणे,श्री. बी.बी.जोगी,संस्थेच्या इतर सर्व शाखांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्यभरातून आलेले स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक, संगणक विभागासहित, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे, सदस्य डॉ.संजीव एन.नारखेडे, राजकिशोर नारखेडे, इतर सर्व संस्था सदस्यांनी भ्रमणध्वनीव्दारे कार्यक्रमासाठी आपला शुभेच्छा संदेश पाठविला. विद्यालयातील ग्रंथपाल व्ही.टी.भंगाळे संकलित, शिक्षणतज्ञ व उद्योग महर्षी स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे एक प्रेरणादायी प्रवास या जीवनपटाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.
सूत्रसंचालन कांचन राणे तर अहवाल वाचन मनोज तडवी यांनी केले. अतिथी परिचय शुभांगी पाटील आणि अध्यक्ष परिचय रिता महाजन यांनी करून दिला. पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचे यादी वाचन सुहास चौधरी आणि वर्षा कुरकुरे यांनी केले. राज्य पुरस्कारांची उद्घोषणा नितीन पाटील यांनी केली. आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक यांनी मानले.


