कॅण्डल रॅली, व्याख्यानातून भुसावळ विभागात महामानवास अभिवादन
भुसावळ (9 डिसेंबर 2024) : शहरासह विभागातील शाळा, महाविद्यालयासह विविध संस्था, संघटनांतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भुसावळ शहरात कॅण्डल रॅली काढण्यात आली तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे. जुन्या पालिकेसमोरील महामानवाच्या पुतळ्यास अभिवादनासाठी गर्दी उसळली होती.
के.नारखेडे विद्यालय, भुसावळ
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात महामानव, विश्वभूषण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. सकाळ शाखेची विद्यार्थिनी ट्विंकल हेमराज चौधरी हिने, तसेच वरिष्ठ शिक्षक डी.एम.हेलोडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय दिला. सूत्रसंचालन व्ही.जी.सोनवणे यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षिका एस.ए. अडकमोल उपस्थित होते. दुपार शाखेत शैलेंद्र महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी दीक्षा सोनवणे, प्रगती कांबळे, प्रज्ञा सोनवणे, भाग्यश्री जगताप, सौरभ निंभोरे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प.क.कोटेचा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : श्रीमती पद्मबाई कपूरचंदजी कोटेचा महिला महाविद्यालयात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) आणि विद्यार्थी विकास विभागातर्फे महामानवास अभिवादन करण्यात आले. प्रतिमेला उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल आणि उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजकुंवर गजरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आर्थिक नीती या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. डॉ.शरद अग्रवाल यांनी कमाल निधी पत्र, अर्थव्यवस्थेची उत्क्रांती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिकीकरण नीति यावर मार्गदर्शन केले. प्रसंगी डॉ.जे.पी.तळेगावकर, रासेयो प्रमुख डॉ.मीना चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.अर्चना झिंगरन, प्रा.आर.एच.पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.माधुरी भुतडा, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मीना चौधरी, प्रा.आर.एच.पाटील, प्रा.श्वेता नागला, प्रा.माधुरी भुतडा, प्रा.निलेश गुरचळ, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.विनोद भालेराव, प्रा.रवीकांत वासनिक, प्रा.श्यामकांत बाविस्कर, डॉ.गिरीष कोळी, प्रा.गिरीश सरोदे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सूत्रसंचालन प्रा.आर.एच.पाटील तर आभार प्रा.पंकज फालक यांनी मानले.
शिंदीतील शाळेतील साहित्य वाटप
भुसावळ : उपदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत जि.प.शाळा शिंदी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची मोठी राजा पाटी, सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक, पट्टी, खोडरबर, पेन्सिल, पेन, 200 पेजेस एकेरी वही, दुरेघी वही, चौरेघी वही, चौकटी वही, विद्यार्थ्यांना प्राणी, पक्षी यांचे आकार तयार करण्यासाठी चिकण मातीचे बॉक्स, रंग खडू, आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक बिस्किट पुडा वाटप करून महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त रेल्वे अकाउंट ऑफिसर बी.व्ही.गायकवाड होते. उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष संदेश शिंदे, यशराज हंबर्डीकर, खानदेश न्यूज चॅनेलचे किरण बोलके, रेल्वे पोलीस संघपाल सावंग, डीआरएम यांचे स्वीय सहाय्यक एम.एम.नायर, मलकापूर अर्बनचे अजय इंगळे, बांधकाम व्यावसायीक दीपक पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि जादूगार श्यामकुमार वासनिक, शिंदी येथील ज्योती शिंपी, प्रदीप सपकाळे, रेल्वे कॉन्ट्रॅक्टर विक्रम सुकदाने, अॅड.आनंद जंजाळे, सेवानिवृत्त शिक्षिका सुवर्णलता तायडे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव हिवराळे, संदीप सपकाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी तर आभार मुख्याध्यापक भगवान बडगुजर यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपशिक्षिका मीनाक्षी पाटील, प्रीती फेगडे, देवका परदेशी, रीना पाटील यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक उपाध्यक्ष उपदेश फाउंडेशनचे संदेश शिंदे यांनी केले.
शारदा विद्या मंदिर, साकळी
साकळी : गावातील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.जे.महाजन होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.जे.पवार, ज्येष्ठ शिक्षक आर.सी.जगताप, जी.एल.चौधरी, बी.ई.महाजन, सदाशीव निळे, व्ही.बी.चौधरी, किरणकुमार चौधरी, एन.पी.पाटील, ए.पी.जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन व माल्यार्पण करण्यात आले. सूत्रसंचालन एन.पी.पाटील तर आभार ए.पी.जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
अनुदानीत आश्रमशाळा, मनवेल
यावल : यावल तालुक्यातील मनवेल येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानीत आश्रमशाळेत अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील होते. प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक राकेश महाजन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला. ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील, अधीक्षिका सरीता तडवी, शिक्षक नितीन चौधरी, कमलाकर इंगळे, विजय चव्हाण, इंद्रजीत पाटील, राजेश भारूळे, राजू पावरा, मोहित अत्तरदे, दीपक ढाके, सचिन विलास पाटील, भारती मरसाळे, चेतन चौधरी, भाऊसाहेब नारायण पाटील, संदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्रण शिक्षक दीपक ढाके यांनी केले.
भुसावळात रक्तदान शिबिर
भुसावळ : शहरात सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. भुसावळ नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी परवेझ अहमद, नगरपालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये शहरातील विविध समाज घटकातील 106 नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया चे सहकार्य लाभले. संध्याकाळी आयोजित केल्या गेलेल्या कॅन्डल मार्चमध्ये शहरातील तीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर, येथून सुरू झालेल्या कॅण्डल मार्चचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल आणि प्रा.डॉ.अनिल हिवाळे यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भुसावळ शहरातील सर्वच बुद्ध विहारांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी बौद्ध विकास समितीचे अॅड.सुनील पगारे, प्रा.डॉ.अनिल हिवाळे आणि समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




