आमदार अमोल जावळेंची भूमी अभिलेख कार्यालयास अचानक भेट
अधिकार्यांची उडाली तारांबळ : शेतकर्यांच्या समस्या ऐकल्या
MLA Amol Javale’s surprise visit to the Land Records Office यावल (12 डिसेंबर 2024) : रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांनी गुरुवारी अचानक यावल भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत अधिकार्यांकडून प्रलंबित प्रकरणांची सविस्तर माहिती घेतली. भेटीदरम्यान, मोजणीसाठी नोटीस पाठवलेल्या शेतकर्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बामणोद येथील शेतकरी वासुदेव चौधरी यांनी नोटीस उशिरा मिळाल्यामुळे मोजणी ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्याचे सांगितले. या कारणामुळे मोजणी रखडल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रलंबित प्रकरणे जाणली
या समस्येवर आमदार अमोल जावळे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश भूमी अभिलेख अधिकारी विजयसिंग पाटील यांना दिले. प्रलंबित प्रकरणांची सविस्तर यादी मागवून त्यांचा आढावा घेतला आणि अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. ऑनलाईन कामकाजाची प्रगती आणि कार्यक्षमता तपासून, कामे सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजनांवर चर्चा केली.

अधिकार्यांची उडाली तारांबळ
आमदार अमोल जावळे यांच्या या अनपेक्षित भेटीने कार्यालयातील अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. प्रलंबित प्रकरणे, ऑनलाईन प्रणालीची प्रगती आणि शेतकर्यांना देण्यात येणार्या सेवेची सखोल माहिती देण्यात अधिकार्यांना कसरत करावी लागली. यावेळी आमदारांनी शेतकर्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्याच्या दृष्टीने अधिकार्यांना सजग राहण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती हर्षल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपूत उपस्थित होते.




