परभरणीतील संविधान विटंबनेचा निषेध : भुसावळात सकल बौध्द समाजाचा मूक मोर्चा
प्रांताधिकार्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन : समाजकंटकावर कठोर कारवाईची मागणी
Protest against the desecration of the Constitution in Parbharani : Silent march of the entire Buddhist community in Bhusawal भुसावळ (24 डिसेंबर 2024) : शहरासह तालुक्यातील सकल बौद्ध समाज, संविधानवादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील समस्त नागरिकांच्या वतीने सोमवार, 23 रोजी परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना तसेच शहिद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
दोषींवर केली कठोर कारवाईची मागणी
परभरणीतील संविधान शिल्पकृती विटंबना प्रकरणात अटकेत असलेला सोपान दत्तराव पवार या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधून काढून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची चौकशी करून दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी तसेच आर्थिक मदत करुन कुटूंबातील एकाला शासकिय सेवेत घ्यावे, खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून शेकडो आंदोलनकर्त्यांसह अनेक निष्पाप तरुण व महिलांना जबर मारहाण करून अटक करण्यात आली. भारतीय संविधानाने दिलेला आंदोलनाचा संवैधानिक अधिकार पायदळी तुडविण्यात आला. याप्रकरणी सखोल कारवाई करुन दोषींना शिक्षेची मागणी समस्त बौध्द समाज, संविधानवादी मोर्चेकर्यांनी केली. यावेळी विनोद सोनवणे, गणेश सपकाळे, विशाल वाघमारे, दिनेश इखारे, देवदत्त मकासरे, वंदना सोनवणे, वंदना आराक, विजय साळवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हत्येची सखोल चौकशी करावी
आंदोलनकर्त्यांपैकी पोलिसांच्या अटकेत असलेला कायद्याचे शिक्षण घेत असलेला तरुण भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीत संशयास्पदरित्या मृत्यू झाला परंतु मृत्यूनंतर वैद्यकीय अहवालात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नसून व्यवस्थेकडून झालेला खून आहे हे निष्पन्न झाले. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण समाजमनावर मोठा आघात झाला आहे. या प्रकाराच्या चौकशीही मागणी मोर्चकर्यांनी यावेळी केली.




