40 हजारांची लाच भोवली : अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या सहा.निरीक्षकाविरोधात गुन्हा
नाशिक (31 डिसेंबर 2024) : अंबरनाथ, उल्हासनगर झोन-4 च्या सहाय्यक निरीक्षकविरोधात 40 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. गणेश किसन शेळके (37) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांच्या मित्रा विरुद्ध जमीन खरेदीदाराने केलेला तक्रारी अर्ज सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके यांच्याकडे होता. तक्रार अर्जाची चौकशी करून तक्रारदार व त्यांचा मित्र अशा दोघांवर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात शेळके यांनी प्रत्येकी 25 हजारांप्रमाणे 50 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती प्रत्येकी 20 हजार रुपये मिळून एकूण 40 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य केल्याने त्यांच्याविरोधात नाशिकरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. 13 डिसेंबर 2024 रोजी लाच पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
नाशिक एसीबी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उप अधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार, विलास निकम आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.









