जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू तस्कर हादरले : गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी 29 वाहने जप्त

महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त धडक कारवाई : सुमारे 3 कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात


जळगाव (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : अवैधरित्या वाळू वाहतुकीला चाप बसण्यासाठी पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील गिरणा नदीपात्रात राबवण्यात आलेल्या मोहिमेत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एकूण 29 वाहने जप्त करण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूकदारांच्या गोटात घबराट पसरली आहे. गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक ही कारवाई केली.

तीन कोटी 60 लाखांची वाहने जप्त
या कारवाईत हायवा, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॅक्टर तसेच उत्खननासाठी वापरण्यात येणार्‍या यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वाहने, यंत्रसामुग्री व वाळूसाठा असा एकत्रीत तीन कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेली सर्व वाहने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या खत कारखाना येथील गोडाऊन परिसरात सुरक्षितरीत्या लावण्यात आली.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव व पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, वैशाली पाटील, भरत नन्नावरे, प्रकाश डहाके, राहुल पवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संयुक्त पथकाने केली.

कारवाईने उडाली खळबळ
ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांबाबत नियमानुसार पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू असून, संबंधितांविरुद्ध प्रचलित महसूल तसेच इतर लागू कायद्यांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महसूल विभागामार्फत यापुढेही नियमित तपासणी व धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !