शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : पुण्याकडे निघालेला 11 लाखांचा गुटखा जप्त
हाडाखेड तपासणी नाक्यावर कारवाई : हरियाणातील चालकाला बेड्या
शिरपूर (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : इंदौरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या गुटख्याच्या ट्रकवर शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हाडाखेड चेकपोस्टवर कारवाई करीत सुमारे 11 लाखांचा गुटखा जप्त केला तर वाहनासह एकूण 26 लाख 32 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांना एका ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. शुक्रवार, 18 रोजी पथकाने सापळा रचल्यानंतर सीमा तपासणी नाका हाडाखेड येथे संशयीत ट्रक (एन.एल.01 ए.एफ.1275) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित सुपारीजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. ट्रक चालक नजीर मजीद (31, रा.49, भडास, मेवात, ता.फिरोजपूर, झिरका, जि.नुहू, हरियाणा, राज्य) विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर आरोपीला अटक करण्यात आली.



11 लाख 32 हजारांचा गुटखा जप्त
ट्रकमधून आरएमडी पानमसाला, राफेल पानमसाला, विना लेबल सुगंधीत तंबाखू, पानमसाला, व्ही 7001 तंबाखू, राजू इलायची सुपारी, राजू ईलायची सुपारी गोल्ड असा एकूण 11 लाख 32 हजार 600 रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा व 15 लाखांचा ट्रक मिळून 26 लाख 32 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, अंमलदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, राजू ढिसले, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे, सुनील पवार, दिनकर पवार, धनराज गोपाळ आदींच्या पथकाने केली.
